नागपूर: सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानितच्या पहिली ते आठवीपर्यंत शाळांची घंटा सोमवारी वाजली. १९ एप्रिलच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना २२ एप्रिलपासून शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिली होती. यासंदर्भात नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनीही पत्र काढून सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना १ जुलैपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सकाळच्या पाळीत अनेक शाळा भरल्या. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रवेश देण्यात आला. काळी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पेढे भरवण्यात आले. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्या शहरानजिक असलेल्या खामगाव रोड येथील ज्ञान विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची शाळेतील पहिल्याच दिवसाची वाट बिकट ठरली. शाळेच्या पहिल्या दिवशी या विद्यार्थ्यांना चक्क चिखलातून जावे लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला. त्यामुळे शाळा प्रवेशाच्या दिवशी एकीकडे विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत तर दुसरीकडे असा बिकट प्रवास असे चित्र पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१८ एप्रिलच्या शिक्षण संचालनालयाच्या पत्रानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची उन्हाळी सुट्टी १ मेपासून जाहीर करण्यात आली होती. तर २०२४-२५ या सत्रात विदर्भ वगळता सर्व विभागातील राज्य मंडळाची शाळा शनिवार १५ जूनपासून सुरू करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले होते. विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्य मंडळाच्या सर्व शाळा ३० जून, रविवार येत असल्याने १ जुलैपासून सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी शाळा सुरू झाल्या.

हेही वाचा – ‘एमपीएससी’कडून सरळसेवा भरती, फडणवीसांच्या घोषणेमुळे समाधान, मात्र ही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन…

हेही वाचा – ‘एमपीएससी’ची ‘टंकलेखन’ परीक्षा तांत्रिक गोंधळामुळे रद्द; उमेदवारांमध्ये संतापाची लाट…

पहिल्या दिवशी सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. त्यासाठी शासनाने निधीची तरतूद केल्याचे सांगण्यात आले. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून यंदा राज्यातील शाळांत ही पुस्तके तब्बल एक कोटी दोन लाख ९० हजार ४२० विद्यार्थ्यांना पुरविली जाणार आहे. त्यासाठी तीन कोटी १९ लाख ५५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पीएमश्री शाळांतील एक लाख ३९ हजार १५५ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. यंदाही वह्यांची जोडलेली पाने असलेली पुस्तके असणार आहे. ही पुस्तके आता नवीन शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवसापासून मिळावी, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. यावेळी शासनाने शिक्षकांसाठीही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिक्षकांना पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासह वर्ग सजावटी करायच्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur on the first day of school students had to go through the mud the agony of the students in the deputy cm city dag 87 ssb