नागपूर : मैत्रीसाठी वाट्टेल ते… असे म्हटले जाते. कारण रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असे मैत्रीचे नाते मानले जाते. दुःखाच्या परिस्थितीत कुटुंबीय, नातेवाईक यांच्यापेक्षा मित्रच मदतीसाठी धावून येतात. अशाच मैत्रीचा प्रत्यय नवीन कामठी शहरात आला. मित्राने मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली. मित्राच्या विरहात दुसऱ्या युवकाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना नवीन कामठी शहरात उघडकीस आली. सचिन देशमुख (२८) असे मृत युवकाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनल जगनाडे (२८, कामठी) आणि सचिन देशमुख यांची जीवापाड मैत्री होती. दोघेही बालपणापासूनच सोबत राहत असल्यामुळे त्यांच्यात कौटुंबिक संबंधही होते. प्रत्येक ठिकाणी दोघेच जात होते. दोघांनाही दारुचे व्यसन होते. दारुच्या व्यसनामुुळे मोनलची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोनल हा मानसिक तणावात होता. तो नाराज राहत होता. वैवाहित आयुष्याबाबत गांभीर्याने विचार करुन पुन्हा दारु प्यायला लागला. तो मित्र सचिन देशमुख याच्याकडे वारंवार दु:ख व्यक्त करीत होता. पत्नीच्या विरहात मोनल नैराश्यात गेला होता. मित्राचे दु:ख बघून सचिनला खूप वाईट वाटत होते. ‘पत्नी सोडून गेली, आता जगून काय फायदा?’ अशी विचारणा तो सचिनकडे करीत होता. मात्र, सचिन त्याला धीर देऊन समजूत घालत होता. मात्र, १२ एप्रिलला मोनलने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मित्राने अचानक आत्महत्या केल्यामुळे सचिन नैराश्यात गेला. दोन दिवस मित्राच्या विरहात असलेल्या सचिन देशमुखने १४ एप्रिलला घरात विष प्राशन केले. काही वेळानंतर त्याच्या आईला सचिनच्या तोंडातून फेस निघताना दिसला. त्यामुळे तिने लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सचिनचा मृत्यू झाला. अशाप्रकारे दोन मित्राच्या आयुष्याचा शेवट झाला. या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
माझा मित्र मला बोलावतोय…
मोनल आणि सचिनची घट्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशिवाय राहत नव्हते. मात्र, मोनलने अचानक आत्महत्या केल्यामुळे सचिन एकाकी पडला. मित्राच्या विरहात दु:खी राहायला लागला. ‘माझा मित्र मला बोलावतोय…तो माझ्याशिवाय राहू शकत नाही…मला त्याला भेटायला जायचे…’ अशाप्रकारचा संवाद तो अन्य मित्रांसोबत साधत होता. मित्राशिवाय जगणे शक्य नसल्यामुळे सचिनेही आत्महत्येचा पर्याय स्वीकारला.