नागपूर : गृहमंत्र्यांचे शहर असूनही नागपुरात गुन्हेगारी शहरात झपाट्याने वाढत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल ९० हत्यांच्या घटनांनी उपराजधानी हादरली आहे. गेल्या ६ दिवसांत तर तब्बल ७ हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. एकामागून एक होत असलेल्या हत्याकांडांनी नागपूरकरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे ‘नागपूर की मिर्झापूर’ असा सवाल उपस्थित होत आहे. या वाढत्या हत्याकांडांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उपराजधानीत गेल्या काही महिन्यांपासून हत्याकांडाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी ते डिसेंबर महिन्यांत ९० हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. मिर्झापूर या वेबसिरिजमध्ये दिवसाढवळ्या गुंड भरचौकात खून करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. तशीच परिस्थिती आता नागपुरातही आहे. पोलिसांचा वचक नसल्यामुळे गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे. वैयक्तिक कारणांसह किरकोळ कारणांमधून या हत्या झाल्याचे उघड झाले. दिवसाढवळ्या चाकूने भोसकणे, पैशांची मागणी करत दगडाने ठेचून खून, चाकूहल्ला असे प्राणघातक हल्ले शहरात वाढले. गेल्या सहा दिवसांत सात हत्येच्या घटना घडल्या. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध असून त्यात अंमली पदार्थ तस्करांचाही समावेश आहे. शहरात सध्या सुरू असलेला हत्यासत्रासाठी अनेक प्रकारची कारणे देण्यात आली. त्यात वैमनस्य, टोळीयुद्ध, युवक-युवतीमधील प्रेमसंबंध, विवाहित महिला व पुरुषांचे अनैतिक संबंध, धार्मिक तेढ, कौटुंबिक वाद, संपत्तीच्या वादासह अन्य कारणांचा समावेश आहे. परंतु, शहरात सर्वाधिक हत्याकांड कौटुंबिक कारण आणि अनैतिक संबंधातून घडलेले आहेत. गेल्या वर्षी एकूण ७९ हत्येच्या घटना नागपुरात घडल्या होत्या. मात्र, यावर्षी आकडा वाढून ९० वर पोहचला आहे. नागपूरची वाटचाल मिर्झापूर होण्याच्या दिशेने सुरू आहे.
हेही वाचा – वाल्मिक कराड शरण येणे हे पोलिसांचे अपयश, फडणवीसांच्या मर्यादा स्पष्ट, कॉंग्रेसचा आरोप
महिलांची सुरक्षा धोक्यात
महिला व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, उपराजधानीत महिलांवर लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार आणि विनयभंगाच्या घटनांसह महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केल्यास पोलीस गांभीर्य दाखवत नाहीत. अशा तक्रारींची तत्काळ दखल घेतल्या जात नाही. त्यामुळे गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे.