नागपूर : वायू प्रदूषणाचे नाव निघाले तर देशाची राजधानी दिल्लीचे नाव आधी समोर येते. दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक हा इतर देशांच्या तुलनेत अधिक असतो. मात्र, नोव्हेंबर महिन्यापासून नागपूर शहरातील प्रदूषणात वाढ झाली आहे. शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक हा ३००पेक्षा अधिक आहे. शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरात सर्वाधिक हिरवळ असताना याच परिसरात ही नोंद झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोव्हेंबर महिन्यातच शहराच्या हवा गुणवत्ता निर्देशांकाने अभ्यासकांना चकित केले होते. या महिन्यात तब्बल २४ दिवस शहर प्रदूषित होते. त्यातील १२ दिवस शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक १५० तर उर्वरित १२ दिवस तो २००पेक्षा अधिक होता. बाकी चार दिवसही तो समाधानकारक श्रेणीत नव्हता. हिवाळ्यात प्रामुख्याने दिवाळीनंतर शहराचा प्रदूषणाचा स्तर वाढतो. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तो अधिक असतो, कारण तो वातावरणाचा परिणाम असतो. नोव्हेंबरमध्येच शहराची स्थिती वाईट असताना डिसेंबरमध्ये परिस्थिती अधिकच वाईट झाली आहे. शहराच्या सर्वाधिक हिरवळीच्या म्हणजेच सिव्हिल लाईन्स परिसरातच हवा गुणवत्ता निर्देशांक ३००च्या वर गेला आहे. त्यामुळे शहराच्या इतर भागाची स्थिती काय असेल, याचा अंदाज लावता येतो. तो ३००च्या वर असणे म्हणजे श्वास घेण्यास धोकादायक आहे.

हेही वाचा: नागपूर विद्यापीठात ‘सुपर कुलगुरूं’कडून ‘सुपरफास्ट’ बैठका!; पुन्हा नव्या वादाला फुटले तोंड

शहरातील सर्वाधिक वृक्ष याच परिसरात आहेत. असे असताना मागील काही दिवसांपासून या परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक हा ३००पेक्षा अधिक आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सिव्हिल लाईन्स येथील संयंत्रातून प्रदूषणाची आकडेवारी पाठवली जाते. शहरातील किमान पारा चढउतार होत असतानाही हवेची गुणवत्ता मात्र खालावली आहे. गेल्या काही वर्षात शहरातील हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण (पीएम २.५) अधिक आहे. हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढल्यास हवेची गुणवत्ता खराब होते. थंडी वाढल्यावर रस्त्यावर राहणारे लोक शेकोटीचा आधार घेतात. त्यामुळेही हवा प्रदूषणात वाढ होते. कारण हिवाळ्यात हवेतील अतिसूक्ष्म धूलिकण हवेत सहज विखुरले जात नाहीत. ते एकाच ठिकाणी गोळा होतात. त्यामुळेही प्रदूषणाचा स्तर वाढलेला दिसून येतो. यापूर्वी सर्वाधिक खराब हवा निर्देशांक २१ ऑक्टोबरला २०० इतका नोंदवण्यात आला. त्या महिन्यातील तो सर्वाधिक थंड दिवस होता आणि त्यादिवशी किमान तापमान १५ अंश सेल्सिअस होते.

शहरात नऊ ठिकाणी हवेतील गुणवत्ता मोजण्याचे संयंत्र लावण्यात आले आहेत. यात विभागीय आयुक्त कार्यालय, सिव्हिल लाईन्स येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय, सदर परिसर, शंकरनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, महाल, मेडिकल चौक, व्हीएनआयटी आदी ठिकाणांचा समावेश आहे.

हेही वाचा: लग्नपत्रिकेतून ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश; आगळ्यावेगळ्या पत्रिकेची सोशल मीडियावर चर्चा!

तारीख – हवा गुणवत्ता निर्देशांक

एक डिसेंबर – ३३३
दोन डिसेंबर – ३२४
तीन डिसेंबर – ३४२
चार डिसेंबर – ३३४
पाच डिसेंबर – ३२९
सहा डिसेंबर – २७६

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur people life in danger air quality index above 300 in civil lines rgc 76 tmb 01