करोनानंतर हॉटेल्समध्ये खवय्यांची गर्दी वाढली आहे. मात्र हल्ली वाढलेल्या उकाड्यामुळे मांसाहारी पदार्थांच्या तुलनेत शाकाहारी पदार्थांना ग्राहकांकडून अधिक मागणी होत असल्याचे निरीक्षण हॉटेल्स मालकांनी नोंदवले आहे.
नागपूर जिल्ह्यात छोटे-मोठे सुमारे दीड ते दोन हजार हॉटेल्स, भोजनालये आहेत. त्यात सावजी भोजनालय व खानावळींचीही संख्या अधिक आहे. बहुतांश हॉटेल्स व भोजनालयातून घरपोच खाद्यपदार्थ पोहोचवले जातात. शहरात शाकाहारी, मांसाहारी व दोन्ही पदार्थ मिळणारी अनेक हॉटेल्स आहेत. एरवी येथे येणाऱ्या ७० टक्के ग्राहकांकडून मांसाहारी आणि ३० टक्के ग्राहकांकडून शाकाहारी पदार्थांची मागणी होते. परंतु, उपराजधानीत सध्या वातावरणात उकाडा वाढला आहे. याचा परिणाम मांसाहारी पदार्थांच्या मागणीवरही झाला आहे. ग्राहक शाकाहारी पदार्थ पसंत करीत आहेत. सध्या ७० टक्के शाकाहारी पदार्थ आणि ३० टक्के मांसाहारी पदार्थाला मागणी आहे. त्यातही शाकाहारी व मांसाहारी पदार्थांमध्ये चटपटीत, तिखट पदार्थांला ग्राहकांची पसंती लाभत आहे, असे हॉटेल मालक सांगतात.
तरुणांना रोजगाराची संधी
एकीकडे शहरी आणि ग्रामीण भागात हॉटेल्सची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे चविष्ट पदार्थ तयार करणारे ‘कूक’ मिळेनासे झाले आहेत. तसेच हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही संख्या कमी आहे. त्यामुळे या क्षेत्रात तरुणांना रोजगाराच्या संधी आहेत.
“राज्यात जास्त तापमान असलेल्या भागात नागपूरचाही समावेश आहे. दमट वातावरणामुळे ग्राहकांकडून मांसाहारी पदार्थांची मागणी कमी झाली व शाकाहारी पदार्थाला मागणी वाढली”
-हर्षल रामटेके, संचालक, बीईंग फुडिज रेस्ट्राॅरेन्ट.