नागपूर : नववर्ष हे नव्या प्रारंभाचे प्रतीक मानले जाते. या निमित्ताने लोक आपल्या जवळच्या व्यक्तींना खास भेट देऊन आनंद साजरा करतात. नागपूरकरही नववर्ष उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत असून पारंपरिक भेटवस्तूंपेक्षा अनोख्या भेटवस्तूंची मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे.

पारंपरिक भेटवस्तूंऐवजी आता वैयक्तिक अनुभव देणाऱ्या भेटवस्तूंना प्राधान्य दिले जात आहे. यामध्ये कस्टमाइज्ड फोटोज, नावासह डायरी, आणि वैयक्तिक संदेश असलेल्या भेटवस्तूंचा समावेश आहे. तसेच, पर्यावरणपूरक भेटवस्तूसुद्धा दिल्या जाणार आहेत. पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तू, रोपांच्या कुंड्या, आणि बायोडिग्रेडेबल वस्तू या गोष्टींना अधिक पसंती मिळत आहे. याशिवाय नववर्षाच्या निमित्ताने आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत फिटनेस आणि वेलनेस उत्पादने गिफ्ट म्हणून देण्याची प्रवृत्तीही दिसून येत आहे. योगा किट्स, ऑर्गेनिक फूड हॅम्पर्स आणि होम वर्कआउट उपकरणे या भेटवस्तूंना मागणी आहे. याशिवाय, डिजिटल भेटवस्तू जसे की ऑनलाईन सबस्क्रिप्शन्स, ई-बुक्स, किंवा ऑनलाईन कोर्सेस हे देखील दिले जात आहेत.

हेही वाचा >>>बहुचर्चित सूरजागड लोहखाणीचा पुन्हा विस्तार, ३१ गावे होणार प्रभावित

इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची लोकप्रियता देखील टिकून आहे. स्मार्ट वॉचेस, फिटनेस बँड्स, आणि वायफाय-सहायक उपकरणे यासोबतच काहीजण ट्रेंडिंग गॅझेट्स जसे की पोर्टेबल प्रोजेक्टर, वायरलेस चार्जर यासारख्या वस्तूंना पसंती देत आहेत. वैयक्तिक भेटवस्तूंमुळे नाती अधिक घट्ट होतात, आणि यामुळेच तरुणाई या भेटवस्तूंना अधिक पसंती देत आहे.

हस्तकला उत्पादनांनाही मागणी

शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये आता स्वनिर्मित वस्तू भेट देण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. हस्तकला उत्पादने आणि स्थानिक कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देणाऱ्या भेटवस्तू बाजारात मोठ्या संख्येत उपलब्ध आहेत. याचा बाजारपेठेतील विक्रेत्यांना मोठा फायदा होत आहे. ही मागणी येत्या काही वर्षांत आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण लोक आपल्या भेटवस्तूंमधून भावना व्यक्त करायला अधिक प्राधान्य देत आहेत, अशी माहिती सीताबर्डीतील एका भेटवस्तू विक्रेत्याने दिली.

Story img Loader