नागपूर : सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत नागपूर महापालिकेच्यावतीने कामठी रोडवर उभारण्यात येणारी ४८० गाळ्यांची स्वप्न निकेतन घरकूल योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरिबांसाठी स्वप्नच ठरण्याची शक्यता आहे. नागपूर महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत घरकुल योजना राबविण्यात येत आहे. परंतु, या योजनेतील गाळे गरिबांच्या आर्थिक क्षमतेबाहेर असल्याने त्यांच्यासाठी ही योजना कुचकामी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेतर्फे योजनेच्या तिसरे घटकांतर्गत खाजगी भागीदारीतून २३०० गाळ्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले होते. याच्या पहिल्या टप्प्यात वांजरा येथे ३०६ तर नारी येथे ३८० गाळे असा एकूण ६८६ गाळ्यांच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. परंतु, प्रत्यक्षात वांजरा येथे ४८० गाळ्यांच्या निर्मितीचाच प्रस्ताव मंजूर होवून गाळ्यांच्या प्रत्यक्ष निर्मितीचे काम सुरू झालेले आहे. महापालिकेच्या योजनेतून ३० वर्ग मिटरचे गाळे ८ लाखांत निर्मित होणार होते व अडीच लाखांचे अनुदान वजा केल्यास प्रत्येक लाभार्थीस ५ लाख ५० हजारांत गाळे उपलब्ध करून देण्याचे नियोजन होते. हे गाळे अल्प उत्पन्न गटांसाठी परवडणारेही होते, परंतु, आता या गाळ्यासाठी पूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

हेही वाचा – सहा चित्त्यांच्या मृत्यूनंतर जाग; ११ सदस्यीय समिती करणार चित्ता प्रकल्पाचे पुनरावलोकन

महापालिकेने आता या गाळ्यांची किंमत ११ लाख ५१ हजार ८४५ रुपये एवढी ठेवली असून त्यातून सरकारी अनुदानाचे अडीच लाख वजा जाता हे गाळे आता ९ लाख १ हजार ८४५ रुपयांना मिळणार आहे. शिवाय बॅंकेकडून कर्ज घेतल्यास मोठ्या रक्कमेचे हप्ते गाळेधारकास भरावे लागणार आहेत. एवढी रक्कम उभी करणे गरीब – आर्थिक दुर्बल घटकांसाठी कठीण असल्याने त्यांच्यासाठी महापालिकेचे घरकूल परवडणारे नाही.

नागपूर सुधार प्रन्यासने वाठोडा – २६४, तरोडी – २३७४ व ९४२ तर वांजरी येथे ७६५ अशा एकूण ४३४५ गाळ्यांची निर्मिती केली आहे. बहुमजली इमारतीतील या गाळ्यांची किंमत ९ ते १२ लाख रुपयांदरम्यान ठेवली गेली. केंद्र व राज्य सरकारचे अडीच लाखांचे अनुदान वजा जाता प्रत्येक गाळे ७ ते ९ लाखांपर्यंत पडते. बॅंकेच्या कर्जाच्या हप्त्यापोटी ही रक्कम अधिक वाढते. प्रन्यासच्या या योजनेत गाळे मंजूर होऊनही अनेकांनी किंमत परवडत नसल्याने गाळे घेण्यास नकार दिला. तर घरकुलासाठी निवड झालेले अनेक लाभार्थी बॅंक कर्जासाठी निकषात बसत नसल्याने गाळ्यापासून वंचित राहिले. अशीच स्थिती महापालिकेच्या स्वप्न निकेतन घरकूल योजनेबाबतही घडण्याची भीती आहे.

हेही वाचा – नागपूर : आणीबाणीच्या काळात कारावास, मानधन वाटपाचा ‘नागपूर पॅटर्न’

घरांचे स्वप्न मृगजळच

पंतप्रधान आवास योजनेतून सर्वांसाठी घर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ठ केंद्र सरकारने निर्धारित केले असले तरी महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासद्वारे निर्मित गाळ्यांची किंमत परवडणारी नसल्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना सरकारने दाखवलेले पक्क्या घरांचे स्वप्न मृगजळच ठरले आहे. – अनिल वासनिक (संयोजक, शहर विकास मंच)