नागपूर : रात्रीची वेळ.. बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी शिकवणी वर्गातून सायकलने घरी जात होती. एक युवक तिचा पाठलाग करीत होता. काही अंतर पार केल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन तो तिच्याशी लगट करू लागला. तिने विरोध केला. हा प्रकार एका महिलेच्या लक्षात आला. ती लगेच मुलीच्या मदतीला धावली. त्यामुळे युवक पळाला. सीसीटीव्ही फुटेजवरून शोध घेत पोलीसांनी त्याला अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरमध्ये घडलेली ही घटना आहे.सुफियान सिराज शेख (१९) रा. ठाकूर प्लॉट, मोठा ताजबाग असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनी बाराव्या वर्गात शिकते. सध्या महाविद्यालयाला उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने कुटुंबीयांनी तिला एनडीएचे वर्ग लावून दिले. सीताबर्डी पोलिस ठाण्यांतर्गत शिकवणी वर्ग आहे. १८ मे रोजी ती नेहमीप्रमाणे शिकवणी वर्गाला गेली. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास शिकवणी आटोपल्यानंतर सायकलने घराकडे निघाली. आरोपी सुफियान शेख हा अलंकार चौकातून दुचाकीने तिचा पाठलाग करीत होता. मात्र, पीडितेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. अंधार पडायला लागला.

हेही वाचा…जगताना देशसेवा, मरताना समाजसेवा,निवृत्त पोलीस हवालदाराकडून अवयवदान…

गिरीपेठच्या निर्जन बोळीतून जात असताना आरोपीने तिला थांबविले. ‘मला मदत पाहिजे,’ असे तो म्हणाला. ‘मी तुला ओळखत नाही, कशाची मदत पाहिजे,’ असा प्रश्न मुलीने केला. त्यावर विकृत मानसिकतेच्या युवकाने तिला ‘वेगळी’च मागणी केली. तिने नकार देताच त्याने तिला जबरदस्तीने मिठीत ओढून अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पीडित विद्यार्थिनीच्या अंगाचा थरकाप उडाला. तिने आरडाओरड केली असता एक महिला मदतीसाठी धावली.

महिला धावत येताना दिसल्याने आरोपी पळून गेला. महिलेने आस्थेने तिची विचारपूस केली. विद्यार्थिनीने महिलेला मोबाईल मागितला. तिच्या मामाला फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तिचा मामा लगेच आला. तिला सीताबर्डी पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये आरोपी स्पष्ट दिसला. पोलिसांना त्याच्याविषयी कुठलीच माहिती नव्हती. केवळ त्याचा चेहरा होता. एवढ्या धाग्यावरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

हेही वाचा…वाशीम जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा; झाडांची पडझड, अनेक घरांचे नुकसान

सुफियान शेख हा चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कजवळील एका कॅफेत काम करतो. तो अशाच प्रकारचे कृत्य नेहमी करतो. त्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा सुफियान याचा प्रयत्न होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त राहुल मदने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक संजय बेडवाल, संतोष कदम, मोसमी कटरे, चंद्रशेखर गौतम, मोहन कनोजिया, संदीप भोकरे, शत्रुघ्न मुंडे, प्रशांत भोयर, रवी राठोड, चेतन शेंडे यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur police arrest youth for intimacy on 12th standard student girl following cctv investigation adk 83 psg