नागपूर : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा महासंचालक असल्याची थाप मारून अनेकांची कोट्यवधीने फसवणूक करणारा महाठक अनिरुद्ध होशिंग याला नागपूर पोलिसांनी अटक केली. त्याने नागपुरातील काही लोकांची लाखोंनी फसवणूक केली होती. तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन दिवसांत आरोपीला अटक केली. सुनील वसंतराव कुहीकर (जयताळा) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिरुद्धने यवतमाळ व नागपुरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना संपर्क केला व तो केंद्रीय पर्यटन मंत्रालयात महासंचालक या पदावर असल्याची बतावणी केली. त्याने पर्यटन विभागात गुंतवणुकीच्या काही योजना असल्याची थाप मारली व चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्याने गुंतवणूकदारांना काही बनावट पत्रिकांचे वाटप केले. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिडला, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, अमिताभ बच्चन, शाहरुख खान सारखे गणमान्य व्यक्ती मुख्य अतिथी दाखविण्यात आले. त्याच्यावर विश्वास ठेवून सुनील कुहीकर यांच्यासह यवतमाळ येथील मीरा फडणीस, नागपुरातील मोहब्बतसिंह बावा, सुभाष मंगतानी यांनी ४८.८५ लाखांची गुंतवणूक केली. मात्र, त्याने कुठलाही आर्थिक परतावा दिला नाही.

हेही वाचा – ॲड. उकेंसह कुटुंबीयांविरुद्ध मोक्का, फडणवीसांच्या विरोधात दाखल केली होती याचिका

कुहीकर यांनी चौकशी केली असता तो तोतया अधिकारी असल्याची बाब स्पष्ट झाली. त्यांनी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी होशिंगविरोधात गुन्हा दाखल केला होता. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात पथक त्याचा शोध घेत होते ई-सर्व्हेलन्सच्या माध्यमातून होशिंग लखनऊमध्ये असल्याची बाब समोर आली. नागपूर पोलिसांच्या पथकाने लखनऊमध्ये जाऊन सापळा रचला व त्याला अटक केली.

टुरिझम व रेल इन्व्हेस्टर्स समिटचा बनाव

यापूर्वी अनिरुद्धने ६ ते ८ डिसेंबरपर्यंत मुंबईच्या हॉटेल ताजमध्ये आयोजित ट्रॅव्हल टुरिझम समिटची निमंत्रण पत्रिका दाखवली. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तेलंगणा बीजेपीचे अध्यक्ष जी. किशन रेड्डी, उत्तरप्रदेशचे पर्यटन मंत्री जयवीर सिंह, अमिताभ बच्चन, कंगना रणौत सारख्या हस्तींचे नाव होते. ७ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२३ पर्यंत आयोजित कथित रेल्वे इन्व्हेस्टर्स समिटमध्ये लोकसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदींचे नाव होते. हा कार्यक्रमही हॉटेल ताजमध्येच आयोजित करण्याचा दावा केला होता.

हेही वाचा – तलाठी भरती परीक्षा अन् केंद्रावर ‘इएनटी’ तज्ञ डॉक्टर उपस्थित! कारण काय ते बघा

समितींमध्ये अध्यक्ष पद देण्याची थाप

अनिरुद्धला जाळ्यात अडकलेल्या गुंतवणूकदारांना अनेक दिवसांपर्यंत कसे गप्प ठेवायचे हे चांगले माहिती होते. जेव्हा गुंतवणूकदारांनी आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली तेव्हा अनिरुद्धने त्यांना विविध विभागांच्या सल्लागार समितीत पद देण्याची थाप मारण्यास सुरुवात केली. यामध्ये पर्यटन आणि रेल्वे विभाग मुख्य होते. गुंतवणूकदारांना कोणतेही परिश्रम न करता थेट अध्यक्षपदी नियुक्तीपर्यंतचे पत्र देण्यात आले. तसेच तो बनावट निमंत्रण पत्रिकांमध्ये या समित्यांत नामित गुंतवणूकदारांची नावेही दाखवत होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur police arrested anirudh hoshing who cheated many people by pretending to be the dg of ministry of tourism adk 83 ssb
Show comments