नागपूर : सोमवारी रात्री झालेल्या दंगलीनंतर या भागातील स्थानिक दुकानदारांची दुकाने बंद आहेत. जमावाने जाळलेल्या गाड्या तशाच उभ्या आहेत. ज्या परिसरात ही घटना घडली तिथे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. आज दंगल शमली आहे. परंतु, पोलीस विभागाच्या दडपशाही धोरणाने मुस्लिम बांधवांवर अमानुष अत्याचार केल्याच्या प्रतिक्रिया हसनपुरी आणि भालदारपुरा परिसरातील मुस्लीम बांधवांच्या आहेत. शाहिस्ता शेख यांनी सांगितले की, त्यांच्या पतीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले.
सोमवारी त्यांच्या दहाव्या दिवसाचा कार्यक्रम असल्याने त्यांचे नातेवाईक आले होते. त्यांच्या घरातील सर्व तरुण मंडळी ही कार्यक्रम असल्याने घरीच होती. परंतु, पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्या मुलांना आणि आलेल्या नातेवाईकांनाही पकडून नेले. त्यांच्यावर अमानुष अत्याचार केला. घराची काचे फोडली आणि सर्व खोल्यांची दारेही तोडली. त्यांच्या मुलं दिवसभर घरीच होती. रात्री दंगल झाल्यावर घरच्या गॅलरीमधून सर्व प्रकार बघत होती. पोलिसांना हे तरुण दिसल्यावर त्यांनी घरासमोर असलेल्या सर्व गाड्या त्यांच्या काठी आणि दगडाने फोडल्या आणि घरातील सात तरुणांची कुठलीही चूक नसताना त्यांना ओढत घेऊन गेले. या सर्व प्रकारात शाहिस्ता शेख यांच्या मुलाचा एक डोळाही फुटला. आता शाहीस्ता आणि त्यांची मुलगी नूसरा पोलिसांना त्यांच्या मुलांविषयी विचारणा करत आहे. परंतु, कुणीही उत्तर देत नाही. तर दवाखाण्यातही त्यांना भेटू दिले जात नाही. दहा दिवसांपूर्वी पतीचे निधन झाले आणि दोन्ही मुलांना अटक करण्यात आल्याने शाहिस्ता शेख यांचा आधार हिरवला आहे. हा सर्व घटनाक्रम सांगताना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.
पोलीसच आमचे शत्रू झाले आणि सर्व काही संपले
नुसरा शेख यांनी सांगितले की, आम्ही पोलिसांना पूर्णपणे मदत करायला तयार आहोत. माझ्या दोन्ही भावांची काहीही चूक नाही. वडिलांचा दहावा दिवस असल्याने ते दिवसभर घरीच होते. परंतु कुठलीही चौकशी न करता त्यांना पकडून नेण्यात आले. त्यांच्यावर अमानुष अत्याचार केला. आमच्या संपूर्ण घराचे नुकसान केले. आम्ही भारताचे नागरिक आहोत. आम्ही येथील व्यवस्थेला पूर्णपणे मदत करायला तयार आहोत. मात्र, पोलीसच आज आमचे शत्रू होत असतील तर आम्ही दाद कुणाला मागायची. काहीही करा, पण, माझ्या भावांना परत आणून द्या. त्यांचा काहीही दोष नाही अशी आर्त हाक नुसरा यांनी दिली.