नागपूर : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (एसएसबी) गुप्त माहितीवरून नंदनवन ठाण्यांतर्गत एका देहव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकला. दलाल तरुणीस अटक करून दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले. चौकशीत अटकेतील महिला पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींकडून देहव्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले. ऐश्वर्या उर्फ आशू गजानन राऊत (२१) रा. मैत्री विहारनगर, खरबी रिंगरोड, असे अटकेतील तरुणीचे नाव आहे. ऐश्वर्याच्या देहव्यवसायाबाबत नंदनवन पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती होती. मात्र, ऐश्वर्यासोबत असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे तिच्या देहव्यवसायाच्या अड्ड्यावर नंदनवन पोलीस छापा टाकत नव्हते, अशी चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बनावट ग्राहक पाठवून…

नंदनवन ठाण्यांतर्गत आरोपी तरुणी ऐश्वर्या स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अल्पवयीन मुलींकडून देहव्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एसएसबीच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी ऐश्वर्याला अटक करण्याची योजना आखली. बनावट ग्राहकाला ऐश्वर्याशी संपर्क करण्यास सांगण्यात आले. त्याने संपर्क साधला असता ऐश्वर्याने त्याला आपल्या घरी बोलावले. गुन्हे शाखेच्या पथकाने तिच्या घराजवळ सापळा रचला. ऐश्वर्याने ग्राहकाकडून पैसे घेताच पोलिसांनी तिच्या घरी छापा टाकला. झडतीमध्ये पोलिसांना तिच्या घरी दोन अल्पवयीन मुली आढळून आल्या. चौकशीत मुलींनी ऐश्वर्याने त्यांना पैशांचे आमिष दाखविल्याची माहिती दिली. दोन्ही मुली गरीब कुटुंबातील आहेत.

हेही वाचा >>> नागपूर : ‘सुपारी किलींग’! विधवा सुनेचे युवकाशी प्रेमसंबंध; सासूला कुणकुण अन्…

पोलिसांनी ऐश्वर्याकडून मोबाईल आणि ग्राहकाने दिलेले २५०० रुपये जप्त केले. तिच्याविरुद्ध नंदनवन ठाण्यात पीटा अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपासासाठी तिला नंदनवन पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.

ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक ललिता तोडासे, हवालदार सचिन बढिये, लक्ष्मण चौरे, अजय पौनिकर, शेषराव राऊत, समीर शेख, अश्विन मांगे, नितीन वासने, कमलेश क्षीरसागर, लता गवई यांनी केली.

हेही वाचा >>> नागपुरात राजकीय नेत्याच्या कारचे ‘हिट अ‍ॅण्ड रन’, पाच वाहनांना धडक

शाळ‌करी मुलींची इंस्टाग्रामवर ओळख

आर्थिक परिस्थितीने पिचलेल्या दोन्ही पीडित मुलींची ओळख ऐश्वर्यासोबत इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली. ऐश्वर्याने दोघींनाही झटपट पैसा कमविण्याचे आमिष दाखवले. त्यांना प्रतिग्राहक १ हजार रुपये देण्याचे ठरले. दोघींनीही देहव्यापार करण्याची तयारी दर्शविली. दोघींनाही तिने आपल्या घरी बोलावले. आतापर्यंत अनेक आंबटशौकीन ग्राहकांकडे त्यांना पाठवण्यात आले. ऐश्वर्यावर वर्धा येथे अंमली पदार्थ तस्करी संदर्भात गुन्हे दाखल आहेत. ती सध्या एका युवकासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याची माहिती आहे. तिचे नंदनवन ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे ती अल्पवयीन मुलींना फसवून देहव्यापार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur police bust sex racket in nandanvan area adk 83 zws