नागपूर : ती मुले अनाथ… ना आईचे प्रेम, ना वडिलांची माया. मनात एखादी इच्छा आकाराला येत असतानाच तिला चिरडून टाकणे, हेच त्यांचे प्रारब्ध…प्रत्यक्ष क्रिक्रेट बघण्याच्या इच्छेचेही असेच झालेले….पण, ध्यानीमनी नसताना एक चमत्कार घडला….जास्त पैसे मोजण्याची तयारी असतानाही भल्या भल्या धनाढयांना तिकीट मिळत नसताना ती या अनाथांच्या हातात मात्र अलगद येऊन पडली…या चमत्काराचे श्रेय नागपूरच्या पोलीस आयुक्तांना…त्यांनी आपले ‘व्हीआयपी पासेस’ या मुलांना दिले अन् त्यांना प्रत्यक्ष स्वप्नपूर्ती अनुभवता आली.
शुक्रवारी सायंकाळी नागपुरात जामठा मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत टी-२० क्रिकेट सामना होता. हा सामना प्रत्यक्षात मैदानावर बघण्याचा अनेकांची इच्छा होती. मात्र, तिकीट विक्री १५ मिनिटात संपल्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला.
विदर्भ क्रिकेट असोशिएशनने नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना ‘व्हीआयपी कॉम्प्लीमेंटरी पासेस’ दिल्या होत्या. पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभे असताना आपण मैदानावर जाऊन क्रिकेट सामना बघणे हे पोलीस आयुक्तांना नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नव्हते. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर या पासेस अनाथालयातील मुलांना देण्याचे ठरले. आयुक्तांनी लगेच एका अनाथालयाच्या व्यवस्थापकाला माहिती दिली आणि मुलांसह पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून घेतले.
हेही वाचा : तुम्ही भव्य दिव्य महामार्ग बांधा पण … गडकरी साहेब, जरा इकडेही लक्ष द्याहेही वाचा :
यावेळी अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने उपस्थित झाले. त्या सर्व अनाथ मुलांना तिकीट वाटप करण्यात आले. त्यांना जामठा मैदानावर सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. मुलांनी प्रत्यक्षात मैदानात बसून क्रिकेट सामना बघण्याचा आनंद घेतला. पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
हेही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारसाठी ‘वाईन’ झाली आता ‘फाईन’ – वडेट्टीवार
आमचे पोलीस कर्मचारी दिवसरात्र बंदोबस्तात असताना अधिकाऱ्यांनी सामन्याचा आनंद घेणे हे नैतिकदृ्ष्ट्या योग्य वाटले नाही. त्यामुळे पासेस अनाथ मुलांना देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याचे ठरवले. -अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, नागपूर.