धीरेंद्र महाराजांनी नागपुरात आयोजित केलेल्या दिव्य दरबारात केलेल्या वक्तव्यांविरोधात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, नागपूर पोलिसांनी धीरेंद्र महाराजांविरोधात जादुटोणा कायदा आणि ड्रग अँड रेमेडीज कायद्यानुसार कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असं स्पष्ट केलं आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (२५ जानेवारी) पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “आम्ही धीरेंद्र महाराजांचा व्हिडीओ बारकाईने पाहिला आहे. त्यात कोणताही चुकीचा प्रकार आढळला नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. पोलिसांवर दबाव असल्याचा काहीच प्रश्न नाही. आमच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा मार्ग श्याम मानव यांच्याकडे आहे. त्यावर मी काहीही प्रतिक्रिया देणार नाही.”
“दिव्य दरबाराचे ७,८ तारखेचे ६ तासांचे व्हिडीओ होते. त्यामुळे याच्या निष्कर्षापर्यंत यायला वेळ लागला. मात्र, या व्हिडीओत कोणताही गुन्हा घडलेला नाही,” असंही अमितेश कुमार यांनी सांगितलं.
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : “…तर मी धीरेंद्र महाराजांच्या पायावर डोकं ठेवेन, माफी मागेन आणि…”, श्याम मानव यांचं पुन्हा एकदा आव्हान
नागपूर पोलिसांनी धीरेंद्र महाराजांना क्लीन चिट दिली का?
नागपूर पोलिसांनी धीरेंद्र महाराजांना क्लीन चिट दिली का? या प्रश्नावर नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “नागपूर पोलिसांनी कोणाला क्लीन चिट देण्याचा विषयच नाही. नागपूरमध्ये त्यांची कोणतीही कृती, वक्तव्य जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा होतो का हे पाहणं हा आमचा तपासाचा भाग होता. आमच्या तपासात असा कोणताही गुन्हा होत नाही, असं निष्पन्न झालं आहे.”