नागपूर : हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहत आहे. ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी आशूतोष डुंबरे यांची बदली करण्यात आली तर गेल्या दीड वर्षांपासून रिक्त असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालक पदावर जयजीत सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याही बदलीचे संकेत मिळत असून अधिवेशनाच्या अखेरीस त्यांची बदली होण्याची चर्चा आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे पोलीस आयुक्तालयात नवे आयुक्त नियुक्तीच्या चर्चा सुरु असतानाच गृह विभागाने सोमवारी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची बदली केली व त्यांच्या जागी आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती केली आहे.
हेही वाचा – नागपूर : रस्त्याच्या कडेला थाटलेल्या संसारावर फिरला ट्रॅक्टर, पती-पत्नीसह मुले…
आता राज्यातील इतरही काही आयुक्तांची बदली होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधीमंडळ अधिवेशन संपल्यानंतर ही घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सप्टेंबर २०२० रोजी नागपुरात रुजू झाले होते. नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. मात्र आता त्यांची बदली होणार असल्याची चर्चा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यांच्या जागी आता नागपूर पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्याला देण्यात येणार याबाबत चर्चांना ऊत आला आहे.
उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यावर मोठी जबाबदारी राहणार आहे. गृह विभागाकडून नागपूरसोबतच पिंपरी चिंचवड, नवी मुंबई येथील आयुक्तांच्या बदल्यांचीदेखील तयारी सुरू झाली आहे. याबाबत अधिकाऱ्यांच्या नावाची चाचपणीदेखील झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय काही शहरांतील सहपोलीस आयुक्त व इतर महत्त्वाच्या पदीदेखील नवीन अधिकारी मिळणार आहेत.
अनूप कुमार यांच्या नावाची चर्चा
अनूप कुमार यांच्या नावाची नागपूर पोलीस आयुक्तपदासाठी चर्चा आहे. त्यांना नागपुरात काम करण्याचा अनुभवसुद्धा आहे. अमितेश कुमार यांची बदली झाल्यास त्यांच्या जागी अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, वायरलेस विभागाचे अपर पोलीस महासंचालक असलेले सुनील रामानंद, सुरेशकुमार मेखला, आस्थापना विभागाचे संजीव सिंघल यांच्या नावांचीदेखील चर्चा आहे.