नागपूर : शहरातील अनेक बार, पब, हॉटेल, हुक्का पार्लर आणि ढाब्यासह पानठेलेसुद्धा मध्यरात्रीनंतर उघडे असतात. काही पोलीस कर्मचाऱ्यांशी आस्थापना संचालकांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्यामुळे रात्री-बेरात्रीनंतरही शहरात ग्राहकांची वर्दळ सुरु असते. या प्रकाराला नव्या पोलीस आयुक्तांनी गांभीर्याने घेतले आहे. यानंतर वेळेचे बंधन आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून थेट आस्थापनाचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत.

शहर पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी शहरातील स्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे याबाबत कठोर भूमिका जाहीर केली. रात्री-बेरात्री सुरू असणारे हॉटेल, पब आणि बार रात्री वेळेपूर्वीच बंद म्हणजे बंद असतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. ‘नाईट लाईफ’च्या नावाखाली रात्री-बेरात्री सुरू राहणाऱ्या हॉटेल, पब आणि बारमध्ये पहाटेपर्यंत मद्यविक्री सुरू असते. अनेक पबमध्ये सरकारी नियमांचे उल्लंघन केले जाते. डीजेवर जोरजोरात गाणी वाजवली जातात. त्यामुळे शहरातील सर्व ‘पब-बार’ रात्री दीड म्हणजे दीड वाजता बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. शासनाने ठरवून दिलेली वेळ पाळण्यात यावी. अन्यथा कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी बजावले आहे.

हेही वाचा… शासकीय कार्यक्रमात ‘तंत्रमंत्र’साठी विशेष व्यवस्था, नागपुरातील महालक्ष्मी सरस प्रदर्शनात भटजी सांगताहेत लोकांचे भविष्य

हेही वाचा… उपमुख्यमंत्री फडणवीस, वनमंत्री मुनगंटीवार यांना ‘डी लीट’ देण्यावरून वाद; गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यप्रणालीवर विविध संघटनांचा आक्षेप

आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली !

पोलीस आयुक्तांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पब,बार, हॉटेल्स आणि ढाब्यासाठी वेळेचे बंधन आणि दारु, गांजा आणि ड्रग्स विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पोलीस आयुक्तांच्या आदेशाला ठाणेदार नेहमीप्रमाणे केराची टोपला दाखवतात. कारण, मध्यरात्रीनंतरही चालणाऱ्या आस्थापनांकडून सुविधा देण्यासाठी ठाणेदारांना ‘विशेष भेट’ देण्यात येते. वाडी, हिंगणा, हुडकेश्वर, कोराडी, मानकापूर, वाठोडा, पारडी, बेलतरोडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे तीनपर्यंत हॉटेल्स-ढाबे उघडे असतात. परंतु, पोलीस कधीच कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे.

Story img Loader