राजकीय नेते, काही पोलीस आणि मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या छत्रछायेमुळे प्रकाशात आलेल्या स्वयंघोषित तोतया समाज माध्यम विश्लेषक अजित पारसेला अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. विशेष म्हणजे, अजित पारसे हा अटक टाळण्यासाठी वारंवार आत्महत्या करण्याचे नाटक करीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

हेही वाचा : विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?

बडकस चौकातील डॉ. राजेश मुरकुटे या होमिओपॅथी डॉक्टरला पंतप्रधान कार्यालयातून कोट्यवधीचा निधी मंजूर करून वैद्यकीय महाविद्यालय काढून देण्याच्या मदतीच्या नावावर साडेचार कोटींची फसवणूक केल्यामुळे पारसेची तोतयेगिरी उघडकीस आली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप पारसेला अटक केली नाही. पोलीस त्याला अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांवर राजकीय दबाव असल्यामुळेच पारसेला अटक होत नसल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. पारसे हा अटक टाळण्यासाठी वारंवार आत्महत्या करण्याचे नाटक करीत असून राजकीय हस्तक्षेपामुळे त्याला अटक होत नसल्याचे बोलले जाते.

अजित पारसेने सीबीआय, ईडीसारख्या केंद्रीय संस्थेतील अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट चौकशीपत्र तयार करून कोटींमध्ये खंडणी उकळली आहे. काही डॉक्टर, व्यापारी आणि संस्थासंचालकांना निधी मिळवून देण्याच्या नावाखाली दिल्लीत नेले. तेथे त्यांच्या खोलीत विदेशी तरुणींना पाठवून अंतरंग दृश्यांचे छायाचित्र आणि चित्रफिती तयार करून पारसेने कोटींची खंडणी उकळल्याची माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अनेक धनाढ्य महिलांशी पारसेने अश्लील ‘चॅटिंग’ केली असून काही महिलांचे अश्लील छायाचित्र अजितच्या लॅपटॉपमध्ये आहेत. त्यामुळे काही महिला दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत.

हेही वाचा : नागपूर : तोतया ‘सोशल मीडिया’ विश्लेषक अजित पारसेवर फसवणुकीचा गुन्हा ; अनेकांकडून उकळली कोटींची खंडणी

अजित पारसे जसा पोलीस विभाग आणि राजकीय पुढाऱ्यांशी जुळला होता. तशाच प्रकारे शहरातील काही जण स्वत:ला ‘सायबर एक्सपर्ट’ समजून महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस विभागात घुसले आहेत. महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांसोबत छायाचित्र काढून फेसबुकवर टाकणारे काही ‘सायबर एक्सपर्ट’ पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे लवकरच आणखी काही तोतया ‘सायबर एक्सपर्ट’चे पितळ उघडे पडणार आहे.

अजित पारसे हा बेरोजगार होता तेव्हापासून हेमंत नावाच्या एका व्यक्तीशी त्याची ओळख झाली. अजितने हेमंतला गुरू मानले. हेमंतने त्याला मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या घरी, कार्यालयात नेऊन त्याची ओळख करून दिली. पारसेंनी सांगितलेल्या योजनांमध्ये पैसा गुंतवणूक करा, असा सल्ला हेमंतने अनेकांना दिला. फसवेगिरीतून कोटींमध्ये कमाई सुरू होताच पारसेने गुरुदक्षिणा म्हणून हेमंतच्या घरी असलेल्या कार्यक्रमात ५० लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याची सध्या शहरात चर्चा आहे. त्यामुळे पोलीस लवकरच हेमंतचीही चौकशी करणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : नागपूर : अजित पारसेचा व्यसनमुक्ती केंद्रात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

आरोपी अजित पारसेवर पोलीस नजर ठेवून आहेत. त्याच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रियासुद्धा झाली आहे. रुग्णालयातून बरा होऊन बाहेर येताच त्याला पोलीस अटक करतील. त्याची संपत्ती जप्त करण्यात येत असून बँक खाती पोलिसांनी सील केली आहेत, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित म्हणाले.

Story img Loader