नागपूर : किमान बारावी उत्तीर्ण अशी पात्रता असलेल्या पोलीस शिपायाच्या भरतीसाठी वकील, अभियंतेही मैदानात उतरले आहेत. नागपूर पोलीस दलात ६०२ पोलीस शिपाई पदांसाठी तब्बल ८५ हजार २८५ युवकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. बुधवारपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरतीला सुरुवात होणार आहे. यावरून बेरोजगारांची दयनीय स्थिती उघड झाली आहे.
इच्छित नोकरीच्या शोधात आयुष्य वाया घालवण्यापेक्षा मिळेल त्या नोकरीसाठी प्रयत्न करावे म्हणून अभियंता, एमबीए, बी. टेक., वकील या भरतीत सहभागी झाले आहेत. यामध्ये तब्बल ३३६ अभियंते व दोन वकील आहेत. व्यावसायिक पदवी घेऊन आपल्या स्वतंत्र्य क्षेत्रात शासकीय नोकरी करावी किंवा स्वतंत्र व्यवसाय करावा, अशी सुप्त इच्छा प्रत्येक उच्चशिक्षत तरुणांमध्ये असते. मात्र, ज्या अभ्यासक्रमातून पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, त्या क्षेत्रात शासकीय नोकरी मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने रिक्त पदासाठी निघालेल्या कोणत्याही जागांवर अर्ज करण्याची ओढ बेरोजगार तरुण-तरुणींमध्ये दिसत आहे. पदवी आणि प्रतिष्ठा बाजूला सारून पोटाची खळगी भरण्यासाठी पोलीस विभागात कर्मचारी म्हणून काम करण्याच्या तयारी या तरुणांनी केली आहे.
हेही वाचा…लाखो हेक्टरवरील पेरण्या रखडल्या, जूनअखेरीसही पाणी टंचाई कायम; कृषिप्रधान बुलढाण्यातील भीषण चित्र
पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाईच्या ६०२ पदांसाठी एकूण ८५ हजार २८४ अर्ज आले. यासोबतच ८ हजार २६४ पदवीधर तर १३०४ पदव्युत्तर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. स्वत:चे स्वप्न बाजूला सारत केवळ बारावी उत्तीर्ण अशी पात्रता असलेल्या पोलीस शिपाई भरतीत अभियंता, एमबीए, बी टेक, वकील यासह अन्य उच्चशिक्षितांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याने जे उमेदवार केवळ बारावी शिकले आहेत. तेसुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
स्वप्नांचा चुराडा
अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना रात्र-रात्र अभ्यास करून गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उत्तीर्ण झालो. शासकीय विभागात अभियंता म्हणून नोकरी लागेल, असे स्वप्न बघत होतो. मात्र, गेल्या ८ वर्षांपासून वेगवेगळ्या विभागात अर्ज करूनही नोकरी लागली नाही. त्यामुळे मनावर दगड ठेवून पोलीस भरतीसाठी सज्ज झाल्याची माहिती एका अभियंत्याने दिली. तर वकील तरुणाने मात्र बोलण्यास नकार दिला.
हेही वाचा…ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यातच स्मार्ट मीटरविरोधी आंदोलन तीव्र होणार… उद्या ठरणार पुढची दिशा…
पोलीस भरतीसाठी बऱ्याच उच्चशिक्षित तरुणांनी अर्ज केले आहेत. त्यांच्या शिक्षण आणि गुणवत्तेचा पोलीस विभागाला नक्कीच फायदा होईल. वाढती सायबर गुन्हेगारी आणि तंत्रज्ञानाचे युग पाहता अशा उच्चशिक्षितांची पोलीस खात्याला मदतच होईल. – डॉ. रवींद्र कुमार सिंगल, पोलीस आयुक्त.