नागपूर : शहरात ड्रग्ज, गांजा आणि अंमली पदार्थांची विक्री, खरेदी आणि तस्करी करणाऱ्यांची कुंडली काढण्यात आली असून ‘ड्रग्जमुक्त शहर’ अभियानासाठी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विद्यार्थी आणि तरुणाईच्या उज्ज्वल भविष्यासाठी पोलीस दक्ष असून यानंतर शहरात एकाही गुन्हेगाराने ड्रग्ज विक्रीचा विचारही केल्यास त्याची खैर केली जाणार नाही, असा खणखणीत इशारा पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिला. त्यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरात हुक्का पार्लर, पब आणि बारमध्ये ड्रग्ज विक्रेते आणि तस्करांचे जाळे असते. विद्यार्थी-विद्यार्थिनी, तरुण-तरुणी सध्या अंमली पदार्थांच्या विळख्यात आहेत. शहरात ड्रग्ज तस्करांचा मुक्त वावर असल्यामुळे दिवसेंदिवस युवा पिढी नशेच्या गर्तेत जात आहेत. मात्र, पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी ‘ड्रग्जमुक्त शहर’ अभियानासाठी जीव ओतून काम सुरू केले आहे. त्यांनी ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित विक्रेते, दलाल, ग्राहक आणि तस्करांची यादी तयार केली असून त्यांच्यावर ‘वॉच’ ठेवणे सुरू केले आहे. तसेच ड्रग्ज-गांजा विक्रीसाठी येणाऱ्या टोळ्यावर स्वतः पोलीस आयुक्तांनी ‘वॉच’ ठेवला आहे. यानंतर एकही आरोपी अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यात सापडल्यास तो आयुष्यभर पोलिसांना लक्षात ठेवेल, अशी कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. सिंगल यांनी दिला.

हेही वाचा…कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित, ऊर्जामंत्र्यांनी दिले ‘हे’ आश्वासन…

बालगुन्हेगार आणि नवगुन्हेगार आव्हान

शहरातील बहुतेक नामांकित गुन्हेगार कारागृहात डांबले असले तरी नव्याने तयार होणाऱ्या गुन्हेगार युवक पोलिसांना आव्हान देत आहेत. परंतु, आता प्रत्येक गुन्हेगाराची कुंडली पोलिसांनी तयार केली आहे. बालगुन्हेगार म्हणजेच विधिसंघर्षग्रस्त बालकांना सुधारण्यासाठी पोलिसांकडून केअर मार्फत प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्या पालकांची समजूत घालण्यात येईल. नवगुन्हेगार निर्माण होऊ नये म्हणून वस्तीत शांतता समितीची बैठक घेण्यात येणार आहे.

वाहतूक नियम मोडल्यास गुन्हे

शहरातील बिघडलेली वाहतूक व्यवस्था ताळ्यावर आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. आता ‘राँग साईड’ वाहन चालवणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. बुलटेचे फटाके फोडणाऱ्यांना अद्दल घडवण्यात येईल तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवण्यात येईल.

हेही वाचा…चंद्रपूर : “भाजपाने बहुजन उमेदवार दिल्यास काँग्रेसचे पानिपत शक्य!” मुनगंटीवार, अहीर व जीवतोडे यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा

अपघाती मृत्यूचे प्रमाण हत्याकांडांपेक्षाही जास्त

दरवर्षी सरासरी ९० ते ९५ हत्याकांडाच्या घटना घडतात. मात्र, रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्यांचा आकडा २८० वर गेला आहे. यावरून शहरातील हत्याकांडापेक्षा अपघातात ठार होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थी व तरुणांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी मी स्वतः नेतृत्व करून वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्यांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न करणार, असेही आयुक्त डॉ. सिंगल म्हणाले.

महिला सुरक्षेला प्राधान्य

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल. बलात्कार, विनयभंग आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दामिनी पथक, भरोसा सेल, सामाजिक सुरक्षा पथक, एएचटीयू पथक, निर्भया पथकांना मजबूत करण्यात येत आहे. महिलांविरुद्धच्या बहुतेक गुन्ह्यात आरोपींमध्ये कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, प्रियकर, मित्र यांचा समावेश असतो. मात्र, रस्त्यावर छेडखानी, टारगटपणा, शेरेबाजी सारख्या घटना घडू नये म्हणून साध्या वेशातील महिला पोलीस पथकांची गस्त वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा…मालवाहू वाहन व कारची धडक, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर; बुलढाण्यातील लव्हाळा-मेहकर मार्गावरील दुर्घटना

‘क्राईम सिटी’ नव्हे तर ‘स्मार्ट सिटी’

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे सायबर जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात सायबर गुन्हेगारांच्या फसवण्याच्या पद्धती आणि गुन्हे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच नागपूरची ओळख ‘क्राईम सिटी’ अशी होती. त्यामुळे आता केवळ ‘स्मार्ट सिटी’ अशी ओळख नागपूरला देण्यास मी आयुक्त म्हणून कटिबद्ध आहे. गुन्हेगार आणि गुन्हेगारीमुक्त शहर निर्माण करण्याचा काटेकोर प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्यासाठी आम्हाला सामान्य नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. सिंगल यांनी केले.

हेही वाचा…दहावीचा हिंदीचा पेपर फुटला? वर्ध्याच्या सेलू येथील प्रकार, शाळा व्यवस्थापन म्हणते…

पोलिसांवरील ताण कमी करणार

नागरिकांच्या सुरक्षेसाठी आमचे पोलीस अंमलदार चोवीस तास अलर्ट मोडवर असतात. बंदोबस्त, गस्त आणि गुन्ह्यांच्या तपासात अधिकारी-कर्मचारी नेहमी व्यस्त असतात. विशेषतः महिला कर्मचारी दुहेरी जबाबदारी सांभाळून कर्तव्य बजावतात. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवरील ताण कमी व्हावा. त्यांना विरंगुळा मिळावा, पुरेशा सुट्या आणि कुटुंबाला वेळ देता यावा तसेच शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीवर भर देता यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur police gather information on criminals and drug dealers to combat crime and drug abuse said cp ravinder kumar singal adk 83 psg