नागपूर : गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येते होते. शेवटी त्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेहच आढळून आला. त्या कर्मचाऱ्याने एका शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. रोशन गिऱ्हेपूंजे (३८) रा. पार्वतीनगर असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे. मात्र, पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचे गुढ अद्याप कायम आहे.

रोशन गिऱ्हेपूंजे यांना आई आणि दोन भाऊ आहेत. एक भाऊ भंडारा पोलिसात आहे. लहान भावाकडे रोशनची आई राहते. रोशन २००८ मध्ये लोहमार्ग पोलिसात रूजू झाला. रोशनला पत्नी वैष्णवी (३०) आणि चार वर्षांची मुलगी ऋन्मयी आहे. रोशन सध्या लोहमार्ग मुख्यालय, अजनी येथे ‘रीडर ब्रांच’मध्ये कार्यरत होता. शनिवार ७ डिसेंबर रोजी नेहमी प्रमाणे तो कार्यालयात गेला. काम आटोपल्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास घरी गेला. एटीएममध्ये रोख रक्कम जमा करायला जात असल्याचे त्याने पत्नीला सांगितले. ‘लवकर परत येतो. सायंकाळी कार्यक्रमाला जायचे आहे. त्यानुसार तयारी करून ठेवा,’ असे त्याने पत्नीला सांगितले. पत्नी तयारी करून त्याची वाट पाहात होती. बराच वेळ होऊनही रोशन घरी परतला नाही. वैष्णवीने पतीबाबत कार्यालयातील काही सहकारी आणि मित्रांसह नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र, त्याचा पत्ता लागला नाही. शेवटी रोशन बेपत्ता झाल्याची तक्रार अजनी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. सुरुवातीला त्याचे ‘लोकेशन’ जबलपूर नंतर वेगवेगळ्या गावात दाखवित होते. दिवसांमागून दिवस निघत असल्याने पत्नीची धाकधूक वाढली होती. शेवटी बेपत्ता झाल्याच्या आठ दिवसानंतर वडेगाव शिवारात रोशनचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. रोशनच्या चार वर्षांच्या ऋन्मयीचे छत्र हरपल्याने परिसरातील लोकांचे डोळे पानावले. शवविच्छेदनानंतर रोशनचे पार्थिव भंडारा जिल्ह्यातील पालोरा या मूळ गावी नेण्यात आले.

हेही वाचा – आरटीई प्रवेश प्रक्रिया यंदा वेळेवर? शाळा नोंदणीस १८ डिसेंबरपासून प्रारंभ

शेतात घेतला गळफास

अजनी पोलीस रोशनचा शोध घेत असतानाच शनिवारी १४ डिसेंबरला सकाळी ११ वाजताच्या सुमारास कुही पोलीस ठाण्याअंतर्गत वडेगाव शिवारात रोशन मृतावस्थेत मिळून आला. अतिशय निर्मनुष्य परिसरात असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत रोशनचा मृतदेह होता. त्याची मोटारसायकल मागील दोन दिवसांपासून एकाच जागी होती. त्यामुळे शेत मालकाचा संशय बळावला. त्याने कुही पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता रोशन गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. शवविच्छेदनानंतर रोशनचे पार्थिक कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

हेही वाचा – उपराजधानी गारठली अन् राजकीय वातावरण तापले; हिवाळी अधिवेशनाआधी…

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

रोशन गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. त्याच्या वागण्यात बदल झाला होता. मात्र, कार्यालयीन कामाचा ताण असल्याचे त्याच्या पत्नीला जाणवत होते. मात्र, रोशनच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही गुलदस्त्यातच आहे. रोशनेने आत्महत्या करण्याच्या निर्णयामागील कारण अजनी पोलीस शोधत आहेत.

Story img Loader