नागपूर : गंगाजमुनात येणाऱ्या ग्राहकांना लुबाडणाऱ्या पोलीस चौकीतील ‘त्या’ चार पोलीस कर्मचाऱ्यांची वरिष्ठांनी चौकीतून उचलबांगडी केली आहे. त्यांच्या नावाने ठाणेदाराने आदेश काढून चारही पोलीस कर्मचाऱ्यांना धारेवर धरले आहे. यापूर्वी, वरिष्ठांनी चौकीतील सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच गंगाजमुना पोलीस चौकीला कुलूप ठोकण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष. शकील शेख, सुखदेव गिरडकर, केशव तोंडरे आणि मुकेश श्रीपाद अशी चौकीतून बदली करण्यात आलेल्या वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
लकडगंज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गंगाजमुना वस्तीत पोलीस चौकी तयार करण्यात आली आहे. गंगाजमुनातील वारांगणांकडे दिवसभरात शेकडो ग्राहक येतात. तसेच गंजाजमुना वस्ती गुन्हेगार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचा अड्डा झाला आहे. त्यामुळे या परिसरात गंगाजमुना पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली. चौकीत सहायक पोलीस निरीक्षक किचक, उपनिरीक्षक माहुलकर यांच्या नेतृत्वात पाच पोलीस कर्मचारी तैनात आहेत. गेल्या काही दिवसांपासून चौकीतील पोलीस कर्मचारी गंगाजमुनात येणाऱ्या ग्राहकांना पकडून चौकीत बसवून ठेवत होते. त्यांना मारहाण करुन पैसे उकळत होते. रोख रक्कम नसलेल्या ग्राहकांना पानठेल्यावरील ‘क्यूआर कोड’वर पैसे पाठवून वसुली करीत होते. याप्रकरणी ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित केल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस उपायुक्त महक स्वामी यांनी चौकीतील सर्वच कर्मचाऱ्यांनी लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले. गंजाजमुनात गेल्या काही दिवसांपासून जुगार अड्डे सुरु झाले आहेत. त्या जुगार अड्ड्यांना शिंदे आणि शकील यांचा आशिर्वाद आहे. अब्दूलच्या माध्यमातून जुगार अड्ड्यावरुन मोठ्या प्रमाणात वसुली सुरु आहे. या सर्व प्रकाराकडे मात्र ठाणेदाराचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी
‘गंगाजमुना चौकी काही काळासाठी बंद करण्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्यांची नियमानुसार चौकशी करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया सहायक पोलीस आयुक्त श्वेता खाडे यांनी दिली.
हेही वाचा – सावधान! ‘समृद्धी’वर दगडफेक, चालकामुळे टळली भीषण दुर्घटना
ठाणेदाराचा वचक नाही
गंगाजमुना पोलीस चौकीतच कर्मचारी दारू पार्टी करतात आणि ग्राहकांना लुटतात, अशी माहिती ठाणेदारापर्यंत पोहचली होती. मात्र, ठाणेदाराने चारही पोलीस कर्मचाऱ्यांना अभय दिले. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची हिंमत वाढली. तक्रार गेल्यानंतरही ठाणेदारांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे चौकीतील कर्मचाऱ्यांच्या वसुलीत मोठी वाढ झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, हा प्रकार उघडकीस येताच चौकीतून शकील, केशव, सुखदेव आणि मुकेश यांची उचलबांगडी केली असून नवीन कर्मचारी लवकरच तैनात करण्यात येणार आहेत.