नागपूर : स्वतःला मीडिया विश्लेषक असल्याचे सांगणाऱ्या महाठग अजित पारसेने क्रूड अँड बायोफ्यूल फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत जांभेकर यांच्या फाऊंडेशनमध्ये सचिव पद मिळवले होते. जांभेकर यांनाही जाळ्यात अडकवले होते. जांभेकर यांचा गुन्हे शाखेने जबाब घेतला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंघोषित मीडिया विश्लेषक अजित पारसेचे कारनामे समोर येत आहेत. नव्याने केलेल्या कारनाम्यात पारसेने हेमंत जांभेकर यांना हाताशी धरले. त्यांच्या संस्थेमध्ये सचिव पद दिल्यास पंतप्रधान कार्यालयातून कोट्यवधींचा निधी मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले. त्यामुळे जांभेकर यांनीही पारसेला संस्थेत सचिवपदी नियुक्ती दिली. त्याला घेऊन एका केंद्रीय मंत्र्यांची भेटही घेतली.
पोलिसांना जांभेकर यांच्यावर संशय होता. पारसेला जांभेकर मदत करीत असून त्याच्या फसवणुकीत त्यांचाही सहभाग आहे का? असा संशय होता. तसेच फिर्यादी डॉ. राजेश मुरकुटे यांची अजित पारसेसोबत ओळखसुद्धा जांभेकरांनीच करून दिली होती. त्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी किशोर पर्वते यांनी जांभेकर यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावले. त्यांचा जबाब नोंदवला. अजित रसे प्रकरणात अन्य काहींची चौकशी होणार असून त्यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. पारसे वारंवार प्रकृती ठीक नसल्याचे सांगून स्वतःची अटक टाळत आहे. मात्र, त्याला लवकरच पोलीस अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पारसेने पाठवले एका महिलेला पैसे
महाठग अजित पारसे याची एका सधन आणि उच्चशिक्षित विवाहित महिलेशी मैत्री होती. ती महिला नेहमी पारसे याच्यासोबत फिरताना दिसत होती. तिने सामाजिक कार्यकर्ता असल्याचे सांगून अजितशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते. परंतु, काही दिवसांतच त्या महिलेने घरात पैशांची अडचण असल्याचे सांगून पारसेकडे मदत मागितली. तिच्या खात्यात पारसेने मोठी रक्कम पाठविली आहे. पारसेने ते पैसे महिलेला का पाठवले, याबाबतही पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.