नागपूर : चोरी, दरोडा, लुटमार, घरफोडीमध्ये चोरीच्या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर चोरट्यांकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करतात. मुद्देमाल पोलीस ठाण्यात पडून असतो. मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या दिवाळीत तक्रारदार-फिर्यादींना तब्बल पावनेचार कोटी रुपयांची दिवाळीभेट दिली आहे. नागरिकांचे चोरी झालेले सोने, वस्तू आणि वाहने परत केल्या. हा आगळा-वेगळा उपक्रम पोलीस भवन कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी संध्याकाळी पार पडला.
यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांच्या हस्ते सुमारे तीन कोटी ८० लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत केला. याप्रसंगी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा त्यांच्या विशेष कामगिरीसाठी सत्कार करून उत्साह वाढविला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले फिर्यादीचे दागिने, रक्कम, सायबर क्राईम फसवणूक, वाहन, मोबाईल, लॅपटॉप, मौल्यवान वस्तू आदी चोरी झाल्यानंतर जप्त करणे आणि जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादीला परत करण्याची प्रक्रिया अंत्यत किचकट असते. यासाठी न्यायालयाकडे पाठपुरावा करून परवानगी घ्यावी लागते. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर फिर्यादीला त्यांच्या चोरी गेलेल्या वस्तू परत करतो. जोपर्यंत फिर्यादीला त्यांच्या वस्तू मिळत नाही तोपर्यंत नागरिकांचाही विश्वास वाढत नाही. त्यामुळे जप्त मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम वेळोवेळी घेतल्या जातो. यावेळी ११०० लोकांचा पावणेचार कोटींचा मुद्देमाल परत करण्यात आला.
हेही वाचा – नागपूर : इंस्टाग्रामवरील मित्राकडून तरुणीचे लैंगिक शोषण
हेही वाचा – नागपुरात आशा वर्कर काळी दिवाळी साजरी करणार, हे आहे कारण..
विशेष कामगिरीसाठी सत्कार
सहायक पोलीस आयुक्त संतोष खांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील, प्रभावती एकुरके, मुकूंद कवाडे, सीमा सुर्वे, संतोष बकाल, भीमा नरके, ज्ञानेश्वर भेदोडकर, अमिता जयपूरकर, अतूल सबनिस, सुहास चौधरी, प्रदीप रायनवार, विशाल काळे, कल्याणी हुमणे यांच्यासह बीट मार्शल, तांत्रिक कर्मचारी तसेच हेल्मेट जनजागृतीसाठी संजय गुप्ता आणि गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मदत करणाऱ्या प्रसिद्धी ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भरोसा सेलमध्ये कौटुंबिक मार्गदर्शन करून अनेकांचे तुटलेले संसार पुन्हा जोडणाऱ्या सीमा सूर्वे व सर्व समूपदेशकांचाही यावेळी पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.