अनिल कांबळे, लोकसत्ता 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर :  मागील पाच वर्षांत उपराजधानीतून ८ हजार ८८२ मुली-महिला बेपत्ता झाल्या असून त्यापैकी नागपूर पोलिसांनी ८ हजार ५०१ मुलींची शोध घेतला आहे. मागील पाच वर्षांत केवळ ३८१ मुली-महिलांचा शोध लागला नाही. बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्यातही नागपूर पोलीस राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

शहरात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांसोबतच अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता होत असल्याने पालकांपुढील चिंता वाढली आहे. मागील पाच वर्षांत २०१९ ते २०२३ (मे) पर्यंत ७४१३ महिला व १४६९ अल्पवयीन मुली नागपुरातून बेपत्ता झाल्याची नोंद नागपूर पोलिसांनी केली आहे. मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मानवी तस्करी विरोधी पथकाची (एएचटीयू) स्थापना करून स्वतंत्र तपास यंत्रणा निर्माण केल्यामुळे बेपत्ता झालेल्या मुली आणि तरुणींचा शोध घेण्यातही मोठे यश मिळवले आहे.

हेही वाचा >>> अमरावती विभागाचा बारावीचा निकाल ९२.७५ टक्के; उत्तीर्णतेच्या टक्केवारीत राज्यात चौथे स्थान

मागील पाच वर्षांत ८ हजार ५०१ मुलींचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. आतापर्यंत केवळ ३८१ मुली-तरुणी बेपत्ता असून त्यांचाही युद्धपातळीवर शोध सुरू आहे. वयाच्या १३ ते १७ व्या वर्षांत प्रेमाचा गंधही नसलेल्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जात असून पळवून नेण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक मुली केवळ शारीरिक आकर्षणाला प्रेम समजून प्रियकरासोबत पलायन करतात. काही महिन्यांतच वादावादीतून मुली पुन्हा आपल्या घराचा रस्ता धरतात.

परंतु, पलायन केलेल्या अनेक मुली देहव्यापार, शरीरविक्री, अंमली पदार्थाचे सेवन किंवा गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या हाती लागतात. अनेक मुली देहव्यापाराच्या दलदलीत फसतात. त्यामुळे पालकांवर्गासाठी ही गंभीर समस्या ठरत आहे. 

शहरातून अल्पवयीन मुली किंवा तरुणी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन संपूर्ण यंत्रणा सतर्क करण्यात येते. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी विशेष एएचटीयू पथक स्थापन करण्यात आले आहे. बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्याला नेहमी प्राथमिकता देण्यात येते. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur police search 8501 missing girls in last five adk 83 zws