नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर पोलीस आयुक्तांनी आठवडाभर विशेष मोहिम राबवून भारतीय शस्त्र अधिनियम कायद्याअंतर्गत ४६ शस्त्र जप्त केली. यामध्ये ५ पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसाचा समावेश आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतरही शहरात गुन्हेगार पिस्तूलाचा वापर करीत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होते. त्यामुळे गुन्हे शाखेची पथके आणि गोपनीय विभागाचे ‘नेटवर्क’ कमकुवत असल्याचे दर्शवते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी आचारसंहिता सुरु झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परवानाधारक शस्त्र सुद्धा जमा करण्याचे आदेश दिले होते. तसेच शहरातील गुन्हेगारांच्या टोळ्यावर लक्ष केंद्रित करून पिस्तूल वापरणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. मात्र, पोलीस आयुक्तांच्या आदेशाला अनेक ठाणेदार गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळेच गुन्हेगार पिस्तूल, तलवारी-चाकूसारखे शस्त्र हातात घेऊन समाजात दहशत पसरवित असतात. पोलीस आयुक्तांनी १६ ते २४ मार्चदरम्यान विशेष मोहिम राबविली. यामध्ये भारतीय शस्त्र अधिनियम कायद्याअंतर्गत ३२ ठिकाणी छापे घालून करीत ४३ गुन्हेगारांवर कारवाई केली.

हेही वाचा…सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचे आव्हान

गुन्हेगारांकडून ४६ शस्त्रे पोलिसांनी जप्त केली. त्यामध्ये ५ पिस्तूल, ९ काडतूस, २६ चाकू, १ कोयता, ४ तलवार आणि एक भाल्याचा समावेश आहे. शहरात भयमुक्त वातावरणात निवडणुका होण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. मात्र, गुन्हे शाखेची पथके आणि गोपनीय विभागही सुस्त पडल्यामुळे अनेक गुन्हेगार समाजात दहशत पसरवित आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur police seize 46 weapons including 5 pistols 9 cartridge ahead of lok sabha elections adk 83 psg