नागपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने पोलीस विभागाच्या विशेष पथकांची पैशांचा गैव्यवहार आणि हवाला रक्कम यावर करडी नजर आहे. उमेश ऐदबान याचे मानेवाडा रोडवर चहाचे दुकान आहे. तो सायंकाळी महाराज बाग चौकाकडून विद्यापीठ वाचनालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर दुचाकी घेऊन उभा होता. तो बराच वेळ तेथे कुणाचीतरी वाट बघत असल्याचे दिसत होते. सीताबर्डी पोलिसांचे एक पथक त्या रस्त्यावरुन गस्त घालत होते. त्यावेळी उमेश हा त्यांना दिसला.
त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलीस जवळ येत असल्याचे बघून उमेश पळायला लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले. त्याच्या दुचाकीच्या डिक्की उघडायला सांगितले असता तो टाळाटाळ करीत होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या हातून दुचाकीची चाबी घेऊन डिक्की उघडली असता त्यात ५०० रुपयांच्या नोटांचे काही बंडल दिसले.
पोलिसांनी लगेच नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तसेच पोलीस उपायुक्त राहुल मदने आणि ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांच्यासमोर आरोपी उमेशला हजर केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नुकताच पुण्यातील खेड शिवापूर टोलनाका परिसरात नाकाबंदीत एका कारमधून पाच कोटी रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली होती. ती रक्कम एका आमदाराची असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ती रक्कम निवडणुकीदरम्यान खर्च करण्यासाठी पाठविण्यात आल्याचा आरोपही काही नेत्यांनी केला होता. या प्रकरणात निवडणूक आयोग, प्राप्तीकर विभाग, पोलीस विभाग तपास करीत आहे. त्या अनुषंघाने नागपुरातही सापडलेली रक्कम कुण्या राजकीय नेत्याशी संबंधित आहे का? याबाबत सीताबर्डी पोलीस तपास करीत आहेत.
सीताबर्डी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन आठ लाख रुपयांची रक्कम जप्त केली. ती रक्कम हवाल्याची असल्याची प्राथमिक माहिती आहे. उमेश रामसिंग ऐदबान (५०, रा.मानेवाडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. जप्त केलेली रक्कम निवडणूक विभागाकडे दिली जाईल, अशी माहिती सीताबर्डी पोलिसांनी दिली.
हेही वाचा…मला महाविकास आघाडीकडून… शिंदे गटातील आमदाराचा गौप्यस्फोट…
रकमेबाबत उडवाउडवीची उत्तरे
उमेशकडून आठ लाखांची रक्कम पोलिसांनी जप्त केली. आचारसंहिता लागल्यानंतर एवढी मोठी रक्कम जप्त केल्याची पहिलीच घटना आहे. जप्त केलेल्या रकमेबाबत पोलिसांनी विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी एका आरोपी उमेशवर गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेली रक्कम निवडणूक निर्णय अधिकारी (पश्चिम विधानसभा मतदार संघ) यांना पुढील कारवाईकरिता माहिती देण्यात आली.