नागपूर : ‘शासकीय काम अन् सहा महिने थांब,’ असे म्हटल्या जाते. कारण शासकीय कार्यालयात पांढऱ्या कागदावर केलेल्या तक्रारीच्या कागदाचा रंग पिवळा होईपर्यंत, त्या कामाला हात लावल्या जात नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परंतु, गिट्टीखदान पोलिसांनी गेल्या २५ वर्षांपासून दाखल झालेल्या गुन्ह्यांचे दस्तावेज आणि अभिलेख माहिती विशिष्ट पद्धतीने संगणकावर साठवून ठेवली आहे. त्यामुळे कोणत्याही गुन्ह्याची माहिती अवघ्या एका ‘क्लिक’वर आणि एका मिनिटांतच मिळण्याची व्यवस्था केली.

पोलीस ठाण्यात विविध प्रकारच्या तक्रारी हाताने लिहून घेण्यात येतात. त्या तक्रारींचा पाठपुरावा आणि तपास होईपर्यंत ते कागदपत्रे सांभाळून ठेवावे लागतात. तसेच काही वर्षांनंतर संबंधित गुन्ह्याची सुनावणी न्यायालयात होत असते. तोपर्यंत पोलीस ठाण्यातील प्रत्येक दस्तावेज साबूत आणि सांभाळून ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असते.

अनेकदा ऊन-वारा-पाऊस याचा परिणाम पोलीस ठाण्यातील मालखान्यात ठेवलेल्या कागदपत्रांवर होतो. त्यामुळे गुन्ह्याची माहिती मिळणे किंवा दस्तावेज मिळणे कठिण असते. यावर तोडगा म्हणून गिट्टीखदान पोलिसांनी पहिला ‘स्मार्ट’ प्रयोग केला आहे. गिट्टीखदानचे ठाणेदार कैलास देशमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २००१ ते २०२५ या वर्षांतील प्रत्येक दस्तावेज व्यवस्थितपणे साठवून ठेवता यावा किंवा वेळवर त्या गुन्ह्याबाबत माहिती मिळावी, या उद्देशाने विशेष उपक्रम राबविण्यात आला. दस्तावेजाचे दोन गटात विभाजन करण्यात आले.

ते दस्तावेज विशेष पिशव्यांमध्ये साठविण्यात आले. या पिशव्यांवर गुन्ह्यांसंदर्भात आकडेवारी आणि वर्ष लिहिण्यात आले. त्यांना एका खोलीत अनुक्रमानुसार ठेवण्यात आले. त्या पिशव्यातील दस्तावेजाला संगणीकृत करुन ‘एक्सल शिट’वर तयार करण्यात आले. त्यामुळे केवळ गुन्हा नोंदणीचा क्रमांक टाकताच त्या गुन्ह्याची सर्व माहिती एका ‘क्लिक’वर समोर येणार आहे.

संगणीकृत दस्तावेजाचा प्रयोग राबविणारे गिट्टीखदान हे पहिलेचे पोलीस ठाणे आहे, हे विशेष. या उपक्रमाचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त राहुल मदने आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी कौतूक केले आहे. हा प्रयोग येत्या काही दिवसांत शहर पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यात राबविणार येणार आहे.

‘एक पोलीस-एक झाड’

 गिट्टीखदान पोलीस ठाण्याचा मोठा परिसर आहे. त्यामुळे गिट्टीखदान पोलिसांनी यापूर्वीसुद्धा ‘एक पोलीस-एक झाड’ हा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात पोलीस ठाण्याचा परिसर झाडा-फुलांनी बहरला आहे. हासुद्धा उपक्रम राबविणारे गिट्टीखदान पोलीस ठाणे पहिलेच असल्याची माहिती ठाणेदार कैलास देशमाने यांनी दिली.