नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने अटक होण्याच्या भीतीपोटी मध्यप्रदेशात पलायन काढल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे नागपूर पोलिसांचे पथक गुरुवारी सकाळीच मध्यप्रदेशाकडे रवाना झाले आहे.

राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून जेम्स लेण्याच्या विकृत लेखनाचे समर्थन करणाऱ्या प्रशांत कोरडकर यांच्या आवाजातील कथित ध्वनिफितीमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. कोरटकर याच्यावर कोल्हापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल होताच ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेऊन स्वतःची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न कोरटकरने केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यामुळे कोरटकरला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी नागपूर गाठले. त्यामुळे अटकेची टांगती तलवार असल्यामुळे कोरटकरने दोन दिवसांपूर्वीच कारने मध्यप्रदेशात पळून गेला. कोरटकर हा इंदूर आणि बालाघाट शहरातील एका मित्राच्या घरी लपून बसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे बेलतरोडी पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेशात सकाळीच रवाना झाले. इंदूर आणि बालाघाट या शहरात नागपूर पोलीस छापेमारी करणार आहेत. दुसरीकडे नागपूर पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून कोरटकरच्या घराला सुरक्षा पुरविली आहे. त्यामुळे कोरटकर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मध्यप्रदेशात पळाल्याची चर्चा होत आहे.

‘त्याला’ मदत करणारा पोलीस अधिकारी कोण?

तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याला राज्यातील दोन मोठ्या राजकीय नेत्यांचा वरदहस्त आहे. त्याचा गृहमंत्रालयात वचक आहे. तसेच पोलीस विभागातील पोलीस अधीक्षक, महानिरीक्षक, अप्पर महासंचालक दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्यांसोबत शेकडो फोटो त्याने फेसबुकवर टाकलेले आहे. त्याची पोलीस विभागातील अनेक अधिकाऱ्यांसोबत मैत्री असल्याचे बोलले जाते. कोरटकरला पळून जाण्यासाठी कुणीतरी पोलीस अधिकाऱ्याने मदत केल्याची चर्चा नागपुरात आहे. त्यामुळे कोरटकरला मदत करणारा ‘तो’ पोलीस अधिकार कोण? याची उत्सूकता अनेकांना लागलेली आहे.

कोरटकरला अटक करा अन्यथा….

गेल्या दोन दिवसांपासून कोरटकर हा नागपुरात होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले नाही. जर पोलिसांनी त्याला ताबडतोब अटक केली नाही तर आम्ही कार्यकर्ते त्याला धडा शिकवू आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात देऊ, असा इशारा सकल मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. गुरुवारी दुपारी बारा वाजता कार्यकर्त्यांनी बेलतरोडीचे ठाणेदार मुकुंद कवाडे यांना या संदर्भात निवेदन दिले आहे.

Story img Loader