तमाम नागपूरकरांनी पक्षाच्या बाजूने बहुमताचा कौल दिलेला असल्याने आता भगवीकरण हीच काळ्या दगडावरची रेघ आहे, त्याला दुसरा पर्यायच नाही, असा ठाम निर्धार भाजपच्या नेत्यांनी सध्या करून घेतलेला दिसतो. शहरातील सर्व आमदार, खासदार, महापालिकेतील सत्ताधारी, हे सारे भगवेसमर्थक असल्याने या शहरात राहणाऱ्या साऱ्यांची मने सुद्धा भगवीमय झालेली आहे, असे या पक्षाला वाटत असेल तर त्यात काही गैर आहे. असे कुणी वाटून घेण्याचे कारण नाही. विरोधी पक्षाला तर यावर बोलण्याचा अधिकारच शिल्लक राहिलेला नाही, त्यामुळे आता सारे शहर भगवे दिसावे, यासाठी महापालिकेने जोरात मोहीम हाती घेतली आहे. जे जे लोकांच्या नजरेत भरणारे असेल ते ते भगवेच असले पाहिजे, असा संकल्प पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सोडला आहे. सामान्य नागरिक कुठेही फिरायला निघाला की, त्याला सारे भगवेच दिसायला हवे. दुसरा रंग किंवा त्या रंगाच्या मागे असलेला विचार दिसायलाच नको, असा या सत्ताधाऱ्यांचा कटाक्ष आहे. पालिकेच्या शाळा, सार्वजनिक इमारती, मोठय़ा बागा आणि दर्शनी, या शब्दात येणारे जे काही असेल ते भगवेच हवे, यासाठी युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. सध्या भगव्याने तमाम नागपूरकरांच्या मनात घर केलेच आहे, मग जे मनात आहे ते डोळ्यांना का दिसू नये, असा साळसूद विचार या पक्षाच्या नेत्यांनी केला असेल तर त्यात गैर ते काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरोधकांनी या भगवीकरणाविरुद्ध नेहमीप्रमाणे ओरड सुरू केली आहे. या शहरात जगप्रसिद्ध अशी दीक्षाभूमी आहे. या पावनस्थळाला अनुसरून निळा रंग सुद्धा वापरता येऊ शकतो, अशी आठवण हे विरोधक जाणीवपूर्वक करून देत आहेत. मात्र, सत्ताधारी तिकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. सारे शहर भगवामय करण्याचे हे काम कुणी कॅमेऱ्यात टिपू नये, याचीही काळजी कटाक्षाने घेतली जात आहे. एकेका इमारतीचे चित्रण कशाला करता?, भगवीकरणाची मोहीम फत्ते होऊ द्या, मग साऱ्याच वास्तूंचे चित्रण करा आणि जगाला दाखवा, असा मानभावी सल्ला देत चित्रण करणाऱ्यांना हाकलून लावले जात आहे. या भगवा प्रकरणावर कुणी आक्षेप घेऊ नये म्हणून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी अगदी जय्यत तयारी करून ठेवली आहे. त्यासाठी एका ठरावाचा दाखला दिला जात आहे व एका माध्यमसमूहाची साक्ष काढली जात आहे. नागपूर हे शहर संत्र्यांची नगरी म्हणून ओळखले जाते. ही ओळख आणखी गडद व्हावी म्हणून प्रमुख इमारतींना संत्र्यांचा नारंगी रंग दिला, तर गुलाबी शहर जयपूरप्रमाणे हे सुद्धा नारंगी शहर होईल, असा या ठरावाचा मतितार्थ आहे. विरोधकांना शांत बसवण्यासाठी रंग आम्ही निवडला नाही, या माध्यमसमूहानेच निवडला, अशीही सारवासारव केली जात आहे. आता या युक्तिवादानंतर विरोधकांना नवेच काम मिळाले आहे. या भगवीकरणामुळे ज्यांना पोटदुखी झाली आहे ते भगवा व नारंगी यात फरक काय, याचा शोध घेण्यासाठी रंगाऱ्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. नारंगी रंग कसा तयार होतो, त्यात आणखी कोणता रंग ओतला तर तो भगवा होतो, याची माहिती घेतली जात आहे. ही माहिती देता देता रंगारी बिचारे थकून गेले आहेत. पिवळ्याची बाधा झालेल्या विरोधकांना भगवा व नारंगी सारखाच दिसायला लागला आहे. यात फरक तर काहीच नाही, या त्यांच्या युक्तिवादाला तोंड देता देता बिचाऱ्या रंगाऱ्यांच्याच तोंडाला फेस येऊ लागला आहे. तसाही भगवा व नारंगी यात असलेला फरक सूक्ष्म म्हणावा असाच आहे. नेमकी हीच गोष्ट सत्ताधाऱ्यांच्या फायद्याची ठरली आहे. म्हणून विरोधकांचा जळफळाट आणखी वाढला आहे.

एकूणच सारे नागपूर सध्या रंगमय झाले आहे. जिकडे जाल तिकडे रंगाचीच चर्चा होताना दिसते. या शहरातील सारे महत्त्वाचे प्रश्न या रंगामुळे मागे पडले आहेत. या शहरात सुरू होणारी मेट्रो सुद्धा भगव्या रंगाचीच राहणार काय?, या प्रश्नाने सध्या विरोधकांना ग्रासले आहे. कारण, या मेट्रोच्या बोधचिन्हात भगवा आहेच. तो हळूच तेथे कुणी शिरवला, यावरही खमंग चर्चा चनापोहे खात ठिकठिकाणी सुरूच दिसते. सारी सत्ताकेंद्रे, त्यावर लक्ष ठेवणारे मातृकेंद्र येथेच असल्याने या शहराच्या कायापालटाचे काम वेगाने सुरू आहे. अनेक प्रकल्प वेगाने समोर सरकत आहेत. आता शहराचा कायापालट करायचाच, तर त्याला रंगाचा साज चढवायलाच हवा. शेवटी सारे काही दिसण्यावरच अवलंबून असते. मग रंग निवडायचाच असेल तर भगव्यासारखाच दिसणारा नारंगी का नको?, असा विचार सत्ताधाऱ्यांनी केला असेल तर त्यात काहीही चुकीचे नाही. सारी विकासकामे करायची, शहर चकाचक करायचे आणि रंग मात्र वेगवेगळे ठेवायचे?, ही कल्पनाच योग्य नाही. मग साऱ्यांना एका रंगात आणले तर बिघडले काय?, हा युक्तिवादही बिनतोड आहे. येत्या काही महिन्यात महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर व समस्यांवर चर्चा घडेल, आरोप-प्रत्यारोप होतील व त्यातून आश्वासने पदरी पडतील, या आशेवर असणाऱ्या साऱ्यांचा या रंगचर्चेमुळे हिरमोड झाला आहे. विरोधक असो वा प्रश्नांनी ग्रस्त झालेली सामान्य जनता, सारे याच चर्चेत न्हाऊन निघाले पाहिजे, असा सत्ताधाऱ्यांचा कटाक्ष आहे. या रंगाचीही एक नशा असते. त्याची झिंग साऱ्यांना चढली पाहिजे. ती एवढी असायला हवी की, वास्तवाचे भान कुणाला राहायलाच नको, असे डावपेचच या भगवीकरणाच्या निमित्ताने आखले जात असतील तर त्यातही काही गैर नाही. लोकांना भावनिक करणे व निवडणुका जिंकणे हाच सध्याच्या काळातील यशाचा मंत्र आहे. तो सत्ताधारी वापरत असतील तर त्यांना दोष देऊन चालणार नाही. त्यामुळे येत्या काळात भगवे अथवा नारंगी नागपूर हाच चर्चेचा विषय राहणार आहे आणि सारे त्यात ‘मोहे रंग दे’ म्हणत सामील होणार असतील तर क्षुल्लक विरोधकांनी डोके खराब करून घेण्याचे काही कारण नाही.

देवेंद्र गावंडे

devendra.gawande@expressindia.com