हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून या शहरातील गुंडांना गुन्हा करण्यासाठी धरमपेठचा परिसर अधिक सुरक्षित वाटू लागला की काय, अशी शंका आता यायला लागली आहे. एकेकाळी कमालीचा शांत आणि सुरक्षित म्हणून ओळखला जाणारा हा परिसर गेल्या दोन वर्षांत गुंडांच्या कारवायांनी पार थरारून गेला आहे. उपराजधानीतील गुन्हेगारी हा काही तसा नवा विषय नाही. इतर शहरांच्या तुलनेत येथे गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. क्षुल्लक कारणावरून खून, हे येथील गुन्हेगारीचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. अनेकदा हे कारणही इतके तकलादू असते की, खून झाल्यावर पोलीसही अचंबित होतात. अशा पद्धतीने घडणारे गुन्हे रोखणे केवळ अशक्य आहे, अशी कबुलीच मध्यंतरी आयुक्तांनी दिली होती. तरीही गुन्हे घडतच आहेत. पोलीस काहीही म्हणोत, पण याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे, पोलिसांचा धाक राहिलेला नाही आणि दुसरे, या गुन्हेगारांना मिळणारे राजकीय पाठबळ. यामुळेच गुन्हा केला तरी काहीही बिघडत नाही, आपल्याला सोडवणारे लोक आहेत, ही वृत्ती साऱ्याच गुन्हेगारांमध्ये बळावत चालली आहे.
गेल्या आठवडय़ात घडलेल्या दोन घटना या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर झगझगीत प्रकाश टाकणाऱ्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे घर ज्या धरमपेठ परिसरात आहे, त्याच भागात एका हॉटेलात मारामारी झाली, त्यात एकाचा खून झाला. यातील मारामारीच्या प्रकरणात भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची दोन्ही मुले आरोपी आहेत. सध्या अटकेत असलेल्या एका मुलाला कोठडी नको म्हणून सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्याला साऱ्या सुविधा मिळाव्यात म्हणून सारे प्रशासन तत्परतेने झटत आहे. आपली मुले अडकली म्हणून आमदार खोपडे स्वपक्षीयांवर आरोप करत सुटले आहेत. मुलांनी मारामारी केली, याचा त्यांना अजिबात पश्चाताप झालेला दिसत नाही. माझ्या मुलांना पकडण्यासाठी पोलीस घाई करत आहेत आणि खुनाच्या आरोपींना मोकळीक देत आहेत, असा आरोप करण्याइतपत त्यांची मजल गेली आहे. मुलांचा बचाव जाहीरपणे करणारे हे खोपडे अशा भानगडी केल्या म्हणून मुलांना दम दिला, असे मात्र जाहीरपणे सांगायला तयार नाहीत. तसे त्यांनी केले असण्याची शक्यताही कमीच आहे. आमदारपुत्रांना मारामारी करण्याचा, दारू पिऊन हॉटेलात गोंधळ घालण्याचा घटनादत्त अधिकारच मिळाला आहे, अशाच अविर्भावात खोपडे वागत आहेत. ‘ती मुले आहेत, झाली चूक त्यांच्याकडून, होते असे कधी कधी’ अशा शब्दात भाजपच्या लोकांकडून या घटनेचे वर्णन केले जात आहे. हेच खोपडे त्यांच्या मतदारसंघात एखाद्या गुंडाने असा धुमाकूळ घातला असता तर वेगळ्या पद्धतीने बोलले असते, मतदारसंघातील लोकांना घेऊन आयुक्तांना भेटले असते, वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली असती व गुंडांना वेळीच आवर घाला, अशी मागणी त्यांनी राजा हरिश्चंद्राच्या अविर्भावात केली असती. आता स्वत:ची मुले अडकल्याबरोबर त्यांची भूमिका १८० अंशाने बदलली आहे. एरवी इतर आरोपींना सुविधा मिळू नये म्हणून कडक वागणारे पोलीस खोपडेपुत्रांच्या बाबतीत बरीच नरमाई दाखवत आहेत. हा सारा सत्तेचा महिमा आहे.
मुख्यमंत्री स्वच्छ, पण त्यांच्या पक्षातील लोक असे गुन्हेगाराला पाठीशी घालणारे, असे सध्याच्या भाजपच्या राजकारणाचे स्वरूप आहे. यातून गुन्हेगारी वाढणार की कमी होणार?, याचे उत्तर सुजाण वाचकांनीच शोधायचे आहे. दुसरी घटना आहे शेजारच्या भंडारा, गोंदियातील. तेथे विधान परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक परिणय फुके विजयी झाले. त्यांचे स्वागत करणाऱ्यांमध्ये संतोष आंबेकर हा कुख्यात गुंड अग्रभागी होता. या गुंडाने नवनिर्वाचित आमदारासोबत मस्त छायाचित्रे काढून घेतली. आश्चर्य म्हणजे, फुकेंनी ती काढू दिली. या निवडणुकीत मतदारांकडून दगाफटका होऊ नये म्हणून उमेदवारांनी काही गुंडांना जबाबदारी दिली होती. लोकशाहीची यापेक्षा दुसरी मोठी क्रूर थट्टा असूच शकत नाही. मतदार पळून जाऊ नयेत, त्याने काही गडबड केली तर धाक बसावा, अशी कामे या गुंडांना देण्यात आली होती. निवडणूक म्हटली की, पैशाचा खेळ आलाच. तो अधिक सुरक्षितपणे खेळता यावा म्हणून गुंडांना आयात करण्याचा हा प्रकार नवा नाही. याआधीही असे घडले आहे. या गुंडांच्या दडपशाहीला यश आले, उमेदवार विजयी झाला, मग त्याचा छायाचित्र काढण्याचा हक्क कसा हिरावून घ्यायचा, असा तर विचार फुकेंनी केला नसेल ना?, अशी शंका आता यायला लागली आहे. हे फुके भाजपचे कार्यकर्ते. हा पक्ष इतरांपेक्षा वेगळा, अशी ओळख सांगून चालणारा. आता गुंडांसोबत छायाचित्र काढणे हे इतरांपेक्षा वेगळेपणात मोडते का?, या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्याने शोधायचे आहे. या मुद्यावर फुकेंनी दिलेले स्पष्टीकरणही मोठे मजेशीर व ते भाजपसाठी कसे लायक आहेत, हेच दर्शवणारे आहे. विजयोत्सवाच्या वेळी अनेकजण येऊन छायाचित्रे काढतात. त्यात कुणी गुंड असेल तर त्याला मी काय करणार?, असे या नवीन आमदाराचे म्हणणे आहे. वरकरणी हे म्हणणे पटणारे असले तरी या कुख्यात गुंडाला अचानक फुकेंच्या स्वागतासाठी का जावेसे वाटले? हा गुंड यवतमाळला का गेला नाही? त्याने भंडाऱ्याचीच वाट का धरली? फुकेंची व त्याची ओळख आहे म्हणून तो गेला का?, या प्रश्नाच्या उत्तरात राजकारणाच्या गुन्हेगारीचे सार दडले आहे. उपराजधानीतील गुन्हेगारीला असे अनेक राजकीय पदर आहेत. त्यामुळे ती वाढतच जाणार, यात शंका नाही. राजकीय पाठबळामुळे निर्ढावलेले हे गुन्हेगार आज मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ कारवाया करीत आहेत, उद्या ते विधान भवनाच्या परिसराची निवड करतील. धरमपेठप्रमाणेच हा परिसर सुद्धा शांत आहे आणि या गुंडांच्या कारवाया वाढल्या की हेच खोपडे व फुके सभागृहात चिंता व्यक्त करतील व मुख्यमंत्री त्याला दमदार उत्तर देतील. हा सारा खेळच सामान्यांच्या आवाक्यापलीकडला आहे व त्याचेच नाव राजकारण आहे!
devendra.gawande@expressindia.com