अकोला : दिव्यांचा सण दिवाळीनिमित्त कोट्यवधी रूपयांची फटके उडवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पनेला ‘फटाके’ लागले. कर्णकर्कश आवाज व धुरामुळे आरोग्यासह पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून प्रदुषणाची पातळी चांगलीच वाढली आहे. दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणारी आतषबाजी झाली. दिवाळीला आनंदोत्सव साजरा करताना कोट्यवधी रुपयांचे फटाके उडवण्यात आले. फटाक्यांविरुद्ध विविध स्तरावर मोहीम राबविण्यात येते. ही जनजागृती मोहीम थंडावल्याचे चित्र यावर्षी दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फटाक्यांमधून निळा, पिवळा, हिरवा, लाल, जांभळा रंग निघण्यासाठी अँल्यूमिनिअम, अँन्टमनी सल्फाईड, बेरियम नायटनेट, तसेच तांबे, शिसे, लिथियम, स्टनॅन्शयम, अर्सेनिक यासारख्या घटकाचा वापर केला जातो. फटाके फोडल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे अनेक दुर्धर व्याधी होतात. गर्भात असलेली मुले व नवजात मुलांना तर हा अधिकच घातक. यासोबतच चार ते पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्यामुळे अनेक किटक, किडे नाश पावतात. आग लागणे, मुले भाजण्याचे प्रकार घडतात. मात्र, याकडे दुर्लक्ष करून दिवाळीत फटाके फोडण्याचा मनमुराद आनंद नागरिकांनी लुटला. दिवाळीमध्ये मोठ्या आवाजात फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे पक्ष्यांना नुकसान पोहचते. त्यामुळेही फटाके कमी प्रमाणात फोडण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले होते. मात्र, त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही.

हेही वाचा…रश्मी शुक्ला यांची संघ मुख्यालयाला भेट आणि पटोले यांची आयोगाकडे तक्रार

वसुबारसपासून सुरू झालेली आतषबाजी भाऊबीजेला रात्री उशिरापर्यंत सुरुच होती. काहींनी नियम डावलून रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्याचा आनंद घेतला. प्रकाशमय दिवाळी साजरी करताना आपण प्रदुषणाची काळी सावली तर गडद करत नाही ना, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. फटाके हे ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक डेसिबलचे आणि आरोग्यावर कायमस्वरूपी परिणाम करणारे आहेत.

फटाके फोडण्याची रंगली स्पर्धा

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या या फटाक्यांमुळे लहान बालके, रुग्ण, अबाल वृद्ध आणि पशु पक्षी यांच्यासह पर्यावरणालाही हानी पोहोचत आहे. मात्र, फटाके फोडण्याच्या स्पर्धेत याचा विचार होत नाही. आता फटाके फोडण्याची स्पर्धा रंगत असल्याने उत्सवाचे स्वरूप विद्रूप होत चालले आहे. फटाक्यांमुळे आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतात, हे माहीत असूनही मोठ्या आवाजात फटाके फोडण्यात येत आहेत. शहरासह ग्रामीण भागातही स्पर्धा दिसून येते.

हेही वाचा…‘रेकॉर्ड’वरील गुन्हेगारांची ‘परेड’

मर्यादा ओलांडणारे फटाके

दिवाळीतील फटाक्यांचा आवाज रक्तदाब वाढवू शकतो. कायमचे बहिरेपण ही येऊ शकते. सुतळी बॉम्ब किंवा पोपटबॉम्ब सारखे फटाके १२० डेसिबल आवाजाची मर्यादा ओलांडतात. ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमांनुसार फटाक्यांना आवाजाची मर्यादा ९० डेसिबल इतकी घालून देण्यात आली आहे. शांतता क्षेत्रात आवाजाची मर्यादा ५० डेसिबल आहे. मात्र, शांतता क्षेत्रातील आवाजाची पातळी सर्रास ओलांडली जाते. आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांची उंची राहत असल्याने, इमारतीत वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या रहिवाशांना मोठा आवाज सहन करावा लागतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur pollution increased on diwali due to use of firecrackers ppd 88 sud 02