नागपूर : उत्तरेकडील राज्यात गारठवणारी थंडी तर दक्षिणेकडे मात्र अवकाळी पावसाची हजेरी, असे विरोधाभासी हवामान सध्या देशात पाहायला मिळत आहे. येत्या पाच तारखेपासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या आगमनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण अरबी समुद्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळेच राज्यात अवकाळी पावसासाठी अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा, कोकण व गोवा येथे अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात पाच आणि सहा जानेवारीला अवकाळी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळू शकतात. शक्यतोवर याठिकाणी ढगाळ वातावरण असेल. तसेच पाच आणि सहा जानेवारीला मात्र काही प्रमाणात आकाशात ढगांची गर्दी दिसू शकते, असाही अंदाज आहे. दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : “माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रम, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेल्या पत्रात नेमकं आहे काय? वाचा…
तीन ते सहा जानेवारी दरम्यान कोकण आणि गोव्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचा अंदाज खरा ठरल्यास शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही कांदा काढण्याची तसेच तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही तूर काढणीची वेळ आहे. रब्बी हंगामातील पिक चांगल्या स्थितीत असताना, अशातच अवकाळी पाऊस आला, तर या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे राज्यात धुक्याचे प्रमाण वाढत असताना, दुसरीकडे अवकाळी पावसाचाही अंदाज आहे. विदर्भाच्या काही भागातही अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.