नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही गाडी मंगळवार वगळता दररोज धावणार आहे. सध्या नागपूरला पोहोचण्यासाठी प्रवासाला ८ तास लागतात; मात्र, नवीन वंदे भारत एक्स्प्रेसला ७ तास १५ मिनिटे लागतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही गाडी नागपूरहून पहाटे ५ ला निघेल आणि दुपारी १२.१५ ला सिकंदराबादला पोहोचेल. या गाडीला सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामागुंडम आणि काझीपेठ स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस परतीच्या प्रवासात सिकंदराबादपासून दुपारी १ वाजता निघेल आणि नागपूरला रात्री ८.२० वाजता पोहोचेल. या गाडीच्या वेळात थोडाफार बदल केला जाऊ शकतो.

हेही वाचा – यवतमाळ : संतप्त महिलांनी अवैध दारू दुकान पेटवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित नागपूर येथे १५ सप्टेंबर २०२४ रोजी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. परंतु, अजून कार्यक्रम अंतिम झालेला नाही. रेल्वेतर्फे लवकरच यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करून सविस्तर माहिती देण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी लोकसत्ताला सांगितले.

मोदींनी नागपुरात यापूर्वी या गाडीला दाखवला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर -बिलासपूर वंदेभारत एक्सप्रेसला ११ डिसेंबर २०२२ रोजी हिरवा झेंडा दाखवला होता. मध्य भारतातील ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस ठरली होती.

वंदे भारत एक्सप्रेस काय आहे?

वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या आणि व्यवस्थापित केलेल्या आधुनिक गाड्यांपैकी एक आहे. ही देशातील अर्धद्रुतगती गाडी आहे. ती उच्च-कार्यक्षमता, इलेक्ट्रिक मल्टी-युनिट ट्रेन आहे. चेन्नईतील सरकारी मालकीच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीकडून (आयसीएफ) तिची रचना आणि निर्मिती केली गेली. ‘वंदे भारत’ला यापूर्वी ‘ट्रेन- १८’ म्हणूनही ओळखले जात असे. २७ जानेवारी २०१९ रोजी गाडीचे नाव बदलून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ असे करण्यात आले, कारण ही गाडी संपूर्णपणे भारतात तयार करण्यात आली होती.

हेही वाचा – गडचिरोली : पुरस्थिती! मुसळधार पावसामुळे भामरागडचा संपर्क तुटला, ५० कुटुंबे…

या गाडीचे वैशिष्ट्य काय?

वंदे भारत एक्सप्रेस डिझाईन आणि वैशिष्ट्य आरडीएसओने (लखनऊ) प्रमाणित केले आहे. ही गाडी स्वदेशी बनावटीची असून सर्वात आधुनिक प्रकारच्या गाडीपैकी एक आहे. या गाडीत विमानासारख्या सुविधा आहेत. ती संपूर्ण वातानुकूलित आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुखकर होतो. प्रत्येक डब्यात मोठ्या खिडक्या आहेत, ज्यामुळे प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा अनुभव घेता येतो. गाडीतील खानपान सेवा उत्कृष्ट असणे अपेक्षित आहे. इतर प्रमुख सुविधांमध्ये स्वयंचलित दरवाजे, स्मोक अलार्म, पाळत यंत्रणा, गंध नियंत्रण प्रणाली, सेन्सरी टॅप इत्यादींचा समावेश होतो. या गाडीमध्ये जीपीएस-आधारित प्रवासी माहिती प्रणाली आहे. बायो-व्हॅक्यूम टॉयलेट आणि फिरते आसन (केवळ एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये) ही वैशिष्ट्ये आहेत. या गाडीला रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur prime minister narendra modi in nagpur on september 15 vande bharat express rbt 74 ssb