नागपूर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. बोरकर आणि नागपूर विभागाचे तंत्रशिक्षण सहसंचालक एम.बी. डायगव्हाणे यांचे बंधू डॉ. पी. बी. डायगव्हाणे हे महाविद्यालयातील प्राध्यापकांचा मानसिक छळ करत असल्याची तक्रार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. शासनाने याविरोधात चौकशी समिती नेमली असून समितीने अहवालही सादर केला आहे. मात्र, प्राचार्यांकडून कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांच्या वाहनातील हवा सोडण्याचे आदेश दिल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.
डॉ. बोरकर हे सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. बी.पी. डायगव्हाणे यांच्या मदतीने इतर सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप आहे. प्राध्यापकांना शोधनिबंध सादर करण्यास मनाई करणे, महिला कर्मचाऱ्यांना उशिरापर्यंत संस्थेत थांबवणे, महिला कर्मचाऱ्यांच्या वाहनातील हवा सोडण्याचे आदेश देणे, विभागप्रमुख आणि प्राध्यापक यांच्या दररोज अनावश्यक बैठका घेणे, सुट्टीच्या दिवशी कार्यक्रमांचे आयोजन करणे असे प्रकार करीत असतात. कर्मचाऱ्यांना हेतूपुरस्सर त्रास देणाऱ्या डॉ. बोरकर आणि डॉ. डायगव्हाणे यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील तसेच तंत्रशिक्षण संचालकांकडे केली आहे. दरम्यान, प्राध्यापकांनी लेखी तक्रार केल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने तीन सदस्यीय चौकशी समितीदेखील नेमली होती. या समितीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देऊन प्राध्यापकांचे आणि प्राचार्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या समितीलाही प्राध्यापकांनी लेखी निवेदन दिले होते. यासंदर्भात राज्य शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. प्राचार्य डॉ. बोरकर हे डॉ. पीबी. डायगव्हाणे यांच्या सल्ल्याने काम करीत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार प्राध्यापकांना क्षुल्लक कारणांनी पत्र दिले जाते. प्रा. डायगव्हाणे यांचे बंधू एम.बी. डायगव्हाणे हे नागपूर विभागाचे तंत्रशिक्षण सहसंचालक आहेत. त्यांच्या नावाने धमक्या देऊन प्राध्यापकांना भीती दाखवली जाते, असा आरोप प्राध्यापकांनी केला आहे.
हेही वाचा – समाज कल्याण विभागाच्या आयुक्ताची सुनावणीला विनाकारण दांडी, न्यायालयाने फटकारले
“ही तक्रार मार्च महिन्यातील आहे. शासनाच्या चौकशी समितीला आम्ही सर्व बाबी समजावून सांगितल्या आहेत. अशा तक्रारींमध्ये काही तथ्य नाही. केवळ द्वेषभावनेतून मोघम तक्रार देण्यात आली आहे. जर या आरोपांमध्ये काही तथ्य असते तर चौकशी समितीसमोर आले असते.” – डॉ. आर.पी. बोरकर, प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय.