नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर नागपूरसह राज्यभरात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात आंदोलन होणार आहे. नागपुरातील आंदोलन व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्याजवळ होणार असल्याची घोषणा स्मार्ट मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.
विद्यमान मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांनाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री होते. यावेळी फडणवीस यांनी राज्यातील सामान्य ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लागणार नसल्याची घोषणा विधानसभेत केली होती. परंतु फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर छुप्या पद्धतीने नादुरूस्त मीटर बदलणे, नवीन जोडणी देणे, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील ग्राहकांकडे हे मीटर लावले जात असल्याचा आंदोलकांचा दावा आहे.
हेही वाचा – संत्री उत्पादकांसाठी १६५ कोटींचे अनुदान, राज्यशासनाची मंजुरी
दरम्यान महावितरण कंपनीच्या स्मार्ट मिटर योजनेला राज्यभर विरोधी पक्ष, वीज ग्राहक, ग्राहकांच्या विविध संघटना व वीज उद्योगातील कृती समितीतील सर्वच संघटनांतर्फे तिव्र विरोध होत आहे. या मीटरविरोधात राज्यभर निदर्शने, मोर्चे, घेराव, कुलूप ठोकणे आदी स्वरूपात सुरू असलेल्या आंदोलनाने वातावरण तापले आहे. ग्रामपंचायत, गाव सभा, शेतकरी संघटना मार्फत या योजनेला विरोधाचे प्रस्ताव शासन व महावितरणच्या व्यवस्थापणाला पाठवले जात आहेत. प्रीपेड स्मार्ट मिटर विरोधी नागरिक समितीतर्फे राज्यभर आंदोलनातून या मीटरमुळे वीज ग्राहक व जनतेवर होणाऱ्या दुरगामी परिणामांची माहिती दिली जात आहे. आता समितीकडून ३० जानेवारीला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी राज्यभर आंदोलनाची घोषणा केली गेली. सरकारने या मीटरबाबतच्या निविदा रद्द करेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे स्मार्ट मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीचे कृष्णा भोयर यांनी सांगितले.
या जिल्ह्यात आंदोलन पेटले…
राज्यातील कोल्हापूर, सांगली, गडहिंग्लज, चिपळून, रत्नागिरी, कुडुवाळी, भंडारा, नागपूर या जिल्ह्यात सध्या स्मार्ट प्रीपेड मीटरबाबत आंदोलन सुरू झाले आहे. नागरिक संघर्ष समितीच्या बॅनर अंतर्गत सर्व पक्ष व जन संघटनांनी हे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची तिव्रता वाढत असून ते इतरही जिल्ह्यात लवकरच सुरू होणार असल्याचा संघर्ष समितीचा दावा आहे.
हेही वाचा – नागपूर : मुलीचा चक्क वडिलांवर बलात्काराचा आरोप, कारण वाचून बसेल धक्का…
संघर्ष समिती काय म्हणते?
स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधी आंदोलन हे जनतेचे आहे. आंदोलनात वीज ग्राहक, कामगार संघटना, ग्राहक संघटनांसह इतरही संघनटांचा सहभाग आहे. सगळ्यांचा खासगीकरणाला विरोध असल्याने राज्यात ३० जानेवारी २०२५ रोजी गांधी पुण्यतिथीच्या दिवशी हे आंदोलन केले जात असल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे.