नागपूर : दीड वर्षांपूर्वी भारतीय रिझर्व बँकेने चलनातून बाद केलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा मजुरांच्या माध्यमातून बदलवून घेणारे मोठे रॅकेट पोलिसांनी उघड केले असून त्याचे ‘कनेक्शन’ थेट दिल्ली, गुजरात आणि उत्तरप्रदेश राज्यांशी असल्याचे तपासात उघड झाले आहे. मजुरांकडून लाखोंच्या नोटा बदलवून त्यांना काही रुपयांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून काम करून घेतल्या जात होते. यामागे व्यापाऱ्यांची टोळी कार्यरत असल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सदर पोलिसांनी दलाल नंदलाल मोर्या (३५) रा. सीताबर्डी, रोहित बावणे (३४) रा. शांतीनगर, किशोर बोहरीया (५४) रा. झिंगाबाई टाकळी आणि व्यापारी अनिलकुमार जैन (५६) रा. जबलपूर-मध्यप्रदेश यांना अटक केली आहे. नोटा बदलून घेणाऱ्या टोळीचा म्होरक्या अनिलकुमार जैन असून त्याने आतापर्यंत कोट्यवधीच्या नोटा बदलवल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – राज्यातील हवामानात येत्या २४ तासात मोठे बदल

गेल्या दीड वर्षांपूर्वी २ हजार रुपयांच्या नोट चलनातून बाद करण्यात आल्या. मात्र, ज्यांच्याकडे अजूनही नोटा आहेत, त्यांनी आरबीआयमध्ये आपला पत्ता, आधारकार्ड देऊन नोटा बदलवून देण्यात येतात. मात्र, त्यासाठी २० हजार रुपये अशी मर्यादा घालण्यात आली आहे. महाराष्ट्रात नागपूर, बेलापूर आणि मुंबई या तीन ठिकाणी नोटा बदलून घेण्यात येते. रिझर्व्ह बँकेत विशेष काऊंटर आहे. मुख्य आरोपी अनिलकुमार जैन हा दिल्ली आणि उत्तरप्रदेशातून २ हजारांच्या चलनी नोटा आणतो. त्या बदलण्यासाठी त्याने नागपुरातील नंदलाल मोर्या, रोहित बावणे आणि किशोर बहोरीया यांना हाताशी धरले. बहोरिया हा झोपडपट्टीबहुल वस्त्यात जाऊन महिलांना गोळा करीत होता. त्या महिलांना ३०० रुपये मजुरी देऊन आरबीआयमधून नोटा बदलविण्यास सांगत होता.

अशी आहे साखळी

अनिलकुमार जैन हा मध्यप्रदेशात फाटक्या नोटा कमी पैशात घेऊन बँकेत बदलविण्याचे काम करायचा. तो दिल्ली, उत्तरप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात अशा राज्यातील व्यापाऱ्यांकडून दोन हजार रुपयांच्या नोटा आणायचा. तो एका लाखावर २० हजार रुपये कमिशन घ्यायचा. तर नागपुरातील रोहित, किशोर आणि नंदलाल या तिघांना प्रत्येक मजुरामागे १ हजार रुपये देत होता. अशाप्रकारे एका लाखांतील जवळपास ७५ हजार रुपये व्यापाऱ्यांना परत देण्यात येत होते.

हेही वाचा – राज्यातील हवामानात येत्या २४ तासात मोठे बदल

आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या नोटा बदलविल्या

गेल्या तीन महिन्यांपासून नोटा बदलविण्यासाठी आरबीआयमध्ये महिलांची अचानक गर्दी वाढायला लागली. त्यामध्ये मजूर, गरीब आणि झोपडपट्टीतील महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. त्यामुळे या रॅकेटची कुणकुण ठाणेदार मनिष ठाकरे यांना लागली. त्यांनी सापळा रचून काही महिलांना ताब्यात घेतले. त्यांनी नोटा बदलविण्याचा मोहबदला म्हणून ३०० रुपये मिळत असल्याची कबुली दिली. त्यानंतर हे अनिल जैनचे नाव समोर आले. या टोळीत आता आणखी आरोपींची संख्या वाढणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur racket of changing 2000 notes through labourers delhi connection adk 83 ssb