प्रत्येक व्यवहारावर अधिभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’च्या हाकेला प्रतिसाद देत रेल्वेने रोकडरहित व्यवहारासाठी पुढाकार घेतला खरा, परंतु यासाठी ग्राहकांच्या खिशात हात घातला जात आहे. हा प्रकार म्हणजे ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ असल्याचे बोलले जात आहे.
निश्चलनीकरणानंतर सर्वच पातळीवर रोकडरहित व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात आहे. रेल्वेने देखील यात आघाडी घेतली. नागपूरसह वर्धा, बल्लारशहा स्थानकावर रोकडरहित व्यवहाराची व्यवस्था करण्यात आली.
आरक्षित व अनारक्षित तिकीट, फलाट तिकीट एवढेच नव्हे तर वाहनतळाचे शुल्क, बाटलीबंद पाणी, फळ, पुस्तक खरेदीसाठी देखील पीओएस यंत्र लावण्यात आले आहे. रेल्वेचे दहा रुपयांचे फलाट तिकीट आहे. शिवाय सर्वात कमी अंतराचे तिकीट देखील दहा रुपयांचचे आहे.
वाहनतळावरील तिकीट देखील किमान पाच रुपये आहे. रोकडरहित व्यवहार वाढविताना मात्र प्रत्येक व्यवहारावर शुल्क आकारण्यात येते. त्यामुळे शंभर, दोनशे-रुपयांच्या व्यवहारासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्यात फायदा नाही. चार-पाच हजार रुपयांच्या व्यवहारकरिता रोकडहरित व्यवहार सोयीचे आहे. सरकारला रोकडरहित व्यवहार प्रोत्साहन द्यायचे असेल तर कोणत्याही प्रकारचे अधिभार नको. सरकारने बँकांना तशा सूचना द्याव्या, परंतु तसे न करता व्यहरातील चलन कमी करण्यासाठी लोकांना रोकडरहित व्यवहार करण्याचे आवाहन करायचे आणि त्यासाठी त्यांच्यावर अधिभार आकारायचा हे अन्यायकारक आहे.
प्रवाशांच्या खिशातून पैसे काढून रोकडरहित व्यवहाराची अंमलबजावणी रेल्वने थांबवावी, असे भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंत शुक्ला म्हणाले.
नागपूर, वर्धा, बल्लरशहा रोकडरहित
नागपूर, वर्धा आणि बल्लारशहा स्थानकावर रोकडरहित व्यवहाराची सोय आहे. प्रवासी या स्थानकावर सर्व प्रकारचे व्यवहार डेबिट, क्रेडिट, पेटीएमच्या माध्यमातून करू शकतात. नागपूर स्थानकावर ३८ पीओएस मशीन लावण्यात आल्या आहेत. यापैकी अनारक्षित तिकीट खिडकीवर ११, आरक्षण तिकीट खिडकीवर १३, पार्सलसाठी ६, सामान आणि क्लॉक रूममध्ये १, विश्रामलयात १, बुक स्टॉलवर १, विभागाच्या खानपान स्टॉलवर ५ पीओएस बसवण्यात आले आहेत. याशिवाय पेटीएम १५ ठिकाणी उपलब्ध आहे. यामध्ये व्हिलर बुक स्टॉलवर १, विविध खासगी खानपान व फळांचे स्टॉलवर ८, संत्रा मार्केटवरील दुचाकी आणि चारचाकी वाहनतळावर ३ तसेच पश्चिम प्रवेशद्वाराकडील दुचाकी आणि चारचाकी वाहनतळावर ३ पीओएस मशीन बसवण्यात आल्या आहेत.
वर्धा स्थानकावर ८ पाईन्ट ऑफ सेल मशीन बसवण्यात आल्या आहेत. यामध्ये अनारिक्षत तिकीट खिडकीवर ३, आरक्षण तिकीट खिडकीवर ३, विश्रामलयात १, बुक स्टॉलवर १ पीओएस आहे. याशिवाय पेटीएमची ५ ठिकाणी व्यवस्था आहे. यामध्ये विविध खासगी खाणपान व फ्रुट स्टॉलवर ३, सवरेदय बुक स्टॉलवर १, दुचाकी आणि चारचाकी वाहनतळावर १ पीओएस आहे.
बल्लारशाह स्थानकावर ९ पीओएस मशीन लावण्यात आली आहे. यामध्ये अनारक्षित तिकीट खिडकीवर ३, आरक्षण तिकीट खिडकीवर ३, पार्सल व सामान कक्षात १, विश्रामलयात १, विभागाच्या खानपान स्टॉलवर १ पीओएस आहे. याशिवाय पेटीएमची ८ ठिकाणी व्यवस्था आहे. यापैकी एक बुक स्टॉलवर, विविध खासगी खाणपान व फ्रुट स्टॉलवर ६, दुचाकी आणि चारचाकी वाहनतळावर १ पीओएस आहे.
व्यवहाराचे नियम
ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेच्या एटीएममधून पाचवेळा आणि इतर बँकेतून तीन वेळा पैसे काढणे नि:शुल्क आहे. त्यानंतरच्या व्यवहारावर शुल्क आकारले जाते. पीओएस किंवा ऑनलाईन सेवा घेताना पाच किंवा तीन व्यवहाराचा नियम लागू होत नाही. हे व्यवहार आणि एटीएममधून पैस काढण्याचे व्यवहार भिन्न मानले जातात
‘‘पाईन्ट ऑफ सेल’ मशीनद्वारे झालेल्या व्यवहारासाठी अधिभार लावण्यात येतो. एक हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी पाव टक्का, एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी अर्धा टक्का अधिभार आकारण्यात येते. कोणतीही सेवा निशुल्क नाही.’’
–हरिहर साव, सहायक महाव्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया.