ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होणार ल्ल अधिसूचना जारी
रेल्वेच्या नागपूर विभागातील नॅरोगेजच्या पाच मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. यामुळे नॅरोगेज ट्रेनमध्ये जगातील सर्वाधिक गतीने धावणारी सातपुडा एक्सप्रेस आणि नागपूरहून मध्य प्रदेशात जाणाऱ्या सर्व गाडय़ा बंद होणार आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने जबलपूर-नैनपूर, नैनपूर-बालाघाट, नैनपूर-छिंदवाडा, नैनपूर मंडला फोर्ट आणि नागपूर-छिंदवाडा मार्गावरील सेवा बंद करण्याची नव्याने अधिसूचना १७ सप्टेंबरला काढली आहे. नागपूरला नॅरोगेजने मध्यप्रदेश जोडणारा मार्गाची सेवा १ नोव्हेंबरपासून समाप्त होत आहे. रेल्वे मार्ग परिवर्तनाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी होताच मध्य प्रदेशातील नॅरोगेजचे जाळे संपुष्टात येईल आणि ब्रॉडगेजच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. महाराष्ट्रात मात्र अजूनही नॅरोगेजचा एक मार्ग सुरू राहणार आहे. नागपूर-नागभीड या मार्गावर रेल्वे सेवा सुरू राहणार आहे. या मार्गाचे अनेकदा सर्वेक्षण झाले. आर्थिक बाबीच्या कारणामुळे या मार्गाच्या रूपांतराचा प्रस्ताव अजून थंडबस्त्यात आहे.
देशातील ज्या भागात रेल्वे मार्ग टाकण्यात आले. त्या भागात रेल्वे विकासगंगा घेऊन गेल्याचे दिसून येते. ब्रॉडगेज रेल्वेमुळे विकासात मागे पडलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट, नैनपूर, मंडला या भागात रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रगतीची चाके अधिक गतीने फिरू लागतील. चंद्रपूर, भंडारा, नागपूर जिल्ह्य़ातून जाणाऱ्या नागपूर-नागभीड रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाची मात्र प्रतीक्षा आहे. या मार्गाचेही तातडीने ब्रॉडगेज करण्याची मागणी बऱ्याच दिवसांची आहे. हा मार्गदेखील दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात येतो.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे उपमुख्य परिचालन व्यवस्थापक जी.एम.एस. नायडू यांनी पाच रेल्वे मार्ग परितर्वनाची अधिसूचना काढली आहे. या मार्गाच्या परिवर्तनासाठी रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे तातडीने जबलपूर-नैनपूर-बालाघाट, छिंदवाडा-नागपूर आणि छिंदवाडा- नैनपूर- मंडला फोर्ट मागार्ंची कामे हाती घेण्यात येत आहेत.
मध्य भारतात सातपुडा रेल्वे म्हणून ब्रिटिशांनी रेल्वेचे जाळे विकले. त्या मार्गावर गेली कित्येक वर्षे स्वतंत्र भारतात देखील प्रवास सुरू आहे. मध्य प्रदेशात मोठय़ा प्रमाणात डोंगर आणि नद्याखोऱ्यातून जाणारे हे नॅरोगेज मार्ग आहे. त्यांचे आता ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण करण्यात येत आहे. हे सर्व रेल्वेमार्ग १९०३ ते १९०९ या कालावधीत सुरू झाले. नागपूर ते छिंदवाडा १४७ किमी, छिंदवाडा नैनपूर- १४१ किमी, जबलपूर-नैनपूर ११० किमी आणि नैनपूर-बालाघाट ७६ किमी आणि नैनपूर-मंडला फोर्ट ४२ किमी मागार्ंचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुख्यालयातर्फे जुलै महिन्यात जाहीर कार्यक्रमानुसार १ ऑक्टोबर २०१५ ते १ जानेवारी २०१६ प्रत्येक महिन्याला एक मार्ग बंद करण्यात येणार होता. परंतु आता नवीन अधिसूनचेनुसार केवळ दोन टप्प्यात पाचही मागार्ंवरील रेल्वे सेवा बंद करण्यात येणार आहे.
* ऑक्टोबरपासून जबलपूर- नैनपूर, नैनपूर-बालाघाट मार्ग बंद.
* नोव्हेंबरपासून नैनपूर-छिंदवाडा, नैनपूर मंडला फोर्ट, नागपूर-छिंदवाडा बंद.
नैनपूर-जबलपूरदरम्यान धावणारी सातपुडा एक्सप्रेस जगातील सर्वाधिक गतीने धावणारी नॅरोगेज रेल्वेगाडी असल्याचे सांगण्यात येते. आशियातील सर्वांत मोठे नॅरोगेज जंक्शन अशी मध्य प्रदेशातील नैनपूरची ख्याती आहे.

Story img Loader