देशाच्या प्रमुख महानगरांना जोडणारा रेल्वेमार्ग राज्याची उपराजधानी नागपुरातून जात असल्याने येथील पायाभूत सुविधा अधिक मजबूत  करण्यासाठी रेल्वेच्या मार्गाच्या तिहेरीकरण, चौपदरीकरणाचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आहेत. औद्योगिक विकासपासून कोसोदूर विदर्भातील गडचिरोली जिल्ह्य़ाला रेल्वे मार्गाने जोडून तिकडे विकासगंगा नेण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकण्यात आले असले तरी विदर्भातील अनेक रेल्वे प्रकल्प निधीअभावी प्रलंबित आहेत. गेले कित्येक वर्षांपासून अशीच स्थिती असल्याने विदर्भात रेल्वेचे जाळे मजबूत करून विकास साधण्यासाठी विदर्भात रेल्वेचे स्वतंत्र झोन असावे, अशी भावना निर्माण झाली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.

पूर्व विदर्भातील इतवारी ते नागभीड नॅरोगेज रेल्वे मार्गाचे अनेकदा सर्वेक्षण सव्‍‌र्हे झाले, परंतु त्यासाठी निधीची तरतूद झालेली नाही. पश्चिम विदर्भातील अचलपूर- मूर्तीजापूर- यवतमाळ (शकुंतला रेल्वे) रेल्वे मार्गाचे काम रखडले आहे. पुलगाव- आर्वी नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झालेले नाही. वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाचे काम भूसंपादन आणि निधीअभावी संथ गतीने सुरू आहे. विदर्भातील बराचसा भूप्रदेश रेल्वेशी अद्यापही जोडलेला नाही. आर्वी-वरुड नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले नाही.  या गतीने विदर्भातील रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू राहिल्यास येथील रेल्वेचा अनुशेष अजून १०० वर्षे भरून निघू शकणार नाही. यासाठी नागपूरला केंद्रस्थानी ठेवून विदर्भात रेल्वे जाळे विणण्याचा विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे.

पुण्याकरिता गुरुवारी रेल्वेगाडी हवी

नागपूर ते पुणे मार्गावर रेल्वेगाडय़ांना कायम गर्दी असते. रेल्वेने अलीकडे वातानुकूलित गाडी सुरू केली. ही गाडी मंगळवारी सुरू करण्यात आली. या दिवशी गरीबरथ आहे. परंतु गुरुवारी एकही थेट गाडी नागपूरहून पुण्याकरिता नाही. तसेच नागपूर ते दिल्लीकरिता थेट गाडीची आवश्यकता आहे.

बुटीबोरी- उमरेड-मौदा आणि चाचेर नवीन मार्ग?

नागपूर रेल्वे स्थानकावर देशाच्या चारही दिशांना जाणाऱ्या गाडय़ांची रेलचेल असते. त्या तुलनेत रेल्वे मार्ग उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक गाडय़ांना ‘आऊटवर’ ताटकळत राहावे लागते. रेल्वे मार्गाचे दुहेरी, तिहेरी, चौपदरीकरण झाल्यानंतर ही समस्या काही प्रमाणात कमी होईल. परंतु त्याचबरोबर मालगाडय़ांची अडचण दूर करण्यासाठी रेल्वे स्थानकाऐवजी अन्य मार्गाचा पर्याय शोधावा लागणार आहे. सेवाग्राम ते नागपूर हा अत्यंत व्यस्त मार्ग आहे. गाडय़ांना जाण्यासाठी मार्ग उपलब्ध होत असल्याने मालगाडय़ांना विलंब होतो आणि रेल्वेचे नुकसान होते. मुंबई आणि हैदराबादकडून येणाऱ्या मालगाडय़ांना बुटीबोरी-उमरेड-मौदा आणि चाचेर मार्गे हावडा लाइनला जोडता येणे शक्य आहे. रेल्वे या मार्गाचे सर्वेक्षण करणे अपेक्षित आहे.