नागपूर: ‘स्टडी यूके ॲल्युमनाई ॲवॉर्ड्स २०२५’ च्या अंतिम फेरीतील नामांकनांची नुकतीच घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांद्वारे विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या इंग्लडमधील माजी विद्यार्थ्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. राजू केंद्रे यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा गौरव त्यांची ‘स्टडी यूके ॲल्युमनाई ॲवॉर्ड्स २०२५’च्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे तिघांना सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा १ मार्चला दिल्ली येथील सार्वजिनक कार्यक्रम होणार आहे.

राजू केंद्रे हे ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (एसओएएस) युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’चे माजी विद्यार्थी आहेत. ‘एकलव्य इंडिया फाउंडेशन’चे सहसंस्थापक आहेत. अनेक वर्षांपासून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ते कार्यरत आहेत. आपल्या भटक्या जमातीच्या ऐतिहासिक अनुभवाचा उपयोग करून ते जागरूकता आणि मार्गदर्शनाद्वारे नेतृत्वगुण विकसित करत आहेत. मध्य भारतात आंतरविद्याशाखीय विद्यापीठ स्थापन करण्याचे राजू केंद्रे यांचे ध्येय आहे.

असे आहे एकलव्यचे काम

एकलव्य इंडिया फाउंडेशनने २०१७ पासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यावर आणि त्यांच्या करिअरची योजना आखण्यात मदत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी त्यांनी सातशेहून अधिक कार्यशाळा आयोजित केल्या. त्यामाध्यमातून पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत एकलव्य प्रत्यक्ष पोहचले आहे. सतराशेहून अधिक विद्यार्थ्यांना देशातील आणि परदेशातील चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यात मदत केली. या संस्थेच्या ४०० हून अधिक माजी विद्यार्थी आज यशस्वी करिअर करत आहेत. फाउंडेशनने अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यात मदत केली आहे. याची किंमत ५० लाख अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे. याशिवाय, फाउंडेशनने ३० हून अधिक विद्यार्थ्यांना जगातल्या प्रसिद्ध विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या आहेत. गेल्या सात वर्षांमध्ये, संस्थेने मार्गदर्शन आणि करिअर मार्गदर्शनासाठी दहा लाख तास समर्पित केले आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना शासकीय कार्यक्रमांनी, ट्रस्ट्स आणि प्रतिष्ठित वैश्विक संस्थांनी ५ मिलियन यूएसडीहून अधिक शिष्यवृत्ती दिल्या आहेत.

पुरस्कार पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना समर्पित – राजू केंद्रे

२०२१-२२ हे वर्ष माझ्यासाठी खास होते. एसओएएस युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये शिकून आणि चेव्हनिंग शिष्यवृत्ती मिळवून माझ्या वैयक्तिक प्रवासासोबत आमच्या ‘एकलव्य इंडिया फाउंडेशन’च्या कामात मोठी भर पडली. अजूनही उच्च शिक्षणाच्या लोकशाहीकरणासाठी आणि वंचित समुदायांना नेतृत्वाची संधी निर्माण करण्यासाठी बरेच काही करणे बाकी आहे. भारतातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे आणि ते निर्णय प्रक्रियेत धोरणकर्ते बनू शकतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा पुरस्कार आम्हाला या दिशेने अधिक प्रयत्न करण्यासाठी प्रेरित करेल. हा पुरस्कार मी वंचित समुदायातील पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना समर्पित करतो असे राजू केंद्रे यांनी सांगितले.

Story img Loader