नागपूर : राजधानी दिल्लीने दोन दिवसांपूर्वी तापमानाने पन्नाशी ओलांडत सर्वांना धक्का दिला. त्यानंतर आता नागपूर शहरातही तापमानाने पन्नाशी ओलांडली. शहराचे तापमान ५६ अंश सेल्सिअसवर गेल्याची माहिती समाजमाध्यमावर पसरली आणि नागपुरात नागरिकांमध्ये खळबळ माजली.
नागपूर शहरात तीन ते चार स्वयंचलित हवामान केंद्र आहेत. उत्तर अंबाझरी मार्गापासून जवळच असलेल्या रामदास पेठेतील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या २४ हेक्टर खुल्या शेताच्या मध्यभागी यातील एक स्वयंचलित हवामान केंद्र आहे. या केंद्रावर आज ५६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद दाखवण्यात आली. समाजमाध्यमावर क्षणभरातच ती बातमी पसरली आणि त्यावरुन एकच गोंधळ उडाला. स्वयंचलित हवामान केंद्राचा डाटा कधीच विश्वसनीय नसतो. ३८ अंश सेल्सिअसनंतर या केंद्रातून योग्य तापमान येण्याची शक्यता फार कमी असते. खुद्द या क्षेत्रातील तज्ज्ञच आणि भारतीय हवामान खात्याचे अधिकारी देखील ते सांगतात. या तापमानानंतर ही यंत्रणा निकामी होण्याची देखील शक्यता असते.
त्यामुळेच भारतात तापमानाची जी काही अधिकृत नोंद घेतली जाते, ती हवामान खात्याच्या अधिकृत केंद्रातूनच घेतली जाते. ही यंत्रणा खात्याचे अधिकारी, कर्मचारी स्वत: हाताळतात. त्यामुळे या केंद्रातून आलेली तापमानाची आकडेवारी हवामान केंद्र जाहीर करते. यात गडबड असण्याची शक्यता फारच कमी असते. नागपूर शहरात मात्र, शुक्रवारी स्वयंचलित केंद्रातून बाहेर पडलेल्या तापमानाच्या आकडेवारीने एकच गोंधळ उडाला. पाहतापाहता ही वार्ता सगळीकडे पसरली आणि एकमेकांना विचारणा सुरू झाली. कारण, गेल्या तीन ते चार दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी उन्ह फार जाणवत नव्हते. उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशार हवामान खात्याने दिला, पण तुलनेने उन्हाचे चटके इतकेही तीव्र जाणवत नव्हते.
हेही वाचा >>>भाजपच्या दोन गटात दगडफेक, पोलिसांचा लाठीमार; बिहारच्या राजकारणात शोभेल असा प्रकार महाराष्ट्रात…
मात्र, या स्वयंचलित केंद्रातून बाहेर आलेल्या आकडेवारीने नागपूरकरांमध्ये चर्चेला पेव फुटले. दरम्यान हवामान खात्यातील एका सुत्रानुसारच गुरुवारीच एका सेंसरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे तापमान चुकीचे नोंदवले गेले. त्यात दुरुस्ती करण्यात आली आणि मग योग्य त्या तापमानाची नोंद झाली. नवी दिल्लीत तीन दिवसांपूर्वीच पाऱ्याने पन्नाशी पार केल्यामुळे नागपूरातही असे होऊ शकते, असेच काही क्षण नागरिकांना वाटले. त्यामुळे जो-तो समाजमाध्यमावर याविषयी पोस्ट करत सुटला आणि गोंधळात आणखी वाढ झाली. तर ज्येष्ठ नागरिकांमध्येही या बातमीने भीतीचे वातावरण पसरले.शहरातील तीन स्वयंचलित केंद्रातून दुपारी २.१५ पर्यंत शहरातील तीन ठिकाणचे कमाल तापमान ५३.७, ५३.२ आणि ४४.४ असे दाखवण्यात आले.