एन. के. पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर रुग्णालयातील आंतरवासिता डॉक्टरांना पूर्ण क्षमतेने वैद्यकीय सेवा दिल्यावरही त्यांना कमी मानधन दिले जाते. त्यामुळे संतप्त डॉक्टरांनी सोमवारपासून मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. तब्बल दीडशे डॉक्टर संपावर गेल्याने येथील रुग्णसेवा प्रभावित झाल्याचा आंदोलकांचा दावा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला एक वर्षे आंतरवासिता म्हणून संबंधित रुग्णालयात सेवा द्यावी लागते. त्यानंतरच त्याला वैद्यकीय पदवी मिळते. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आंतरवासिता म्हणून सेवा देणाऱ्याला महिन्याला ११ हजार रुपये, खासगी महाविद्यालयात सात ते साडेसात हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु, नागपुरातील डिगडोह येथील एन. के. पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर रुग्णालयातील विद्यार्थ्यांना मात्र केवळ ३ हजार रुपये मानधन दिले जाते. त्यातही एक साप्ताहिक सुट्टीचा दिवस वजा करून डॉक्टरांना केवळ अडीच हजार देऊन बोळवण केली जाते.

आंतरवासिता डॉक्टरांनी वेळोवेळी महाविद्यालय प्रशासनाला मानधन वाढवण्यासाठी विनंती केली. परंतु, गेल्या दोन महिन्यापासून ते ही मिळाले नसल्याने शेवटी संप सुरू केल्याचा आंदोलकांचा दावा आहे. त्यातच डॉक्टर संपावर गेल्याने महाविद्यालय प्रशासनाने आंदोलकांना जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार नोटीस दिली आहे. त्यामुळे डॉक्टर आणखी संतापल्याने बुधवारी येथे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संपकर्त्यांनी दिला आहे. सध्या येथे दीडशेच्या जवळपास आंतरवासिता डॉक्टर्स आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur resident doctors of lata mangeshkar hospital are on strike msr