नागपूर : चार पिढ्यांपासून एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने राहणाऱ्या महाल परिसरात सोमवारी झालेल्या दंगलीनंतर दोन समाजातील मने दुभंगली आहेत. दंगलखोरांनी जुने हिस्लॉप कॉलेज परिसरात नागरिकांची घरे, गाड्यांवर दगडफेक केली. यात अनेक गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले. पेशने यांच्या घरातील चारचाकी जळून खाक केली. दंगलखोरांनी घराच्या दारावरील, वाहनांवरील छायाचित्र पाहून तोडफोड केली, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

चिटणीसपार्क चौकाच्या उजवीकडे राहणाऱ्या पेशने यांनी संपूर्ण दंगलीचा थरार सांगितला. ते म्हणाले, रात्री पावणेआठच्या सुमारास काही तरुण आमच्या घराच्या दिशेने दगड घेऊन धावले. सुरुवातीला पाच-दहा तरुण होते. नंतर हा जमाव दोनशे ते चारशेचा झाला. त्यांनी आमच्या घरातील खिडक्यांची तोडफोड केली. बाजूला ठेवलेली चारचाकी जाळली. तिच्यावर भला मोठा दगडही मारला. घरात दोन महिला होत्या. इतका मोठा जमाव पाहून पोलीसही घाबरले. तेही आमच्या घरात येऊन लपले. शेवटी जमाव दुसऱ्या दिशेने वळला. साठ वर्षांपासून आम्ही या परिसरात राहतो. परंतु, असा वाद कधीच पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पुढच्या पिढीला काय शिकवण देणार?

आम्ही ४५ वर्षांपासून महाल परिसरात राहतो. हिंदू-मुस्लीम सारेच गुण्यागोविंदाने एकत्र राहतो. कधीच दंगल हा प्रकार पाहिला नाही. परंतु, सोमवारी दंगलखोरांनी आमच्या घरावरच हल्ला केला. बाहेर असलेले एसीचे काॅम्प्रेसर फोडले. चारचाकी तोडली, अशी गंभीर बाब अंजली भिसे यांनी सांगितली. हे फार भयंकर आहे. येणाऱ्या पिढीला आपण कुठली शिकवण देणार असा प्रश्नही त्यांनी केला.

दंगलखोरांचे मनसुबे ठेचून काढा

दंगलखोर तरुण होते. आता आमच्या नाकाच्या वर पाणी गेले आहे. यांच्यावर कठोर कारवाई झाल्याशिवाय पर्याय नाही. दंगलखोरांचे मनसुबे ठेचून काढा, अशा कठोर शब्दात प्रकाश शिर्के यांनी प्रतिक्रिया दिली. दंगलखोरांचा धर्मग्रंथ त्यांना हिंसेची शिकवण देते का, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

हंसापुरीत दोन्ही बाजूंनी दगडफेक

महालनंतर हंसापुरी परिसरात मध्यरात्री दंगल उसळली. यावेळी गीतांजली चौकाच्या दोन्ही बाजूंनी दगडफेक केल्याची माहिती शाकीब यांनी दिली. एका बाजूला पोलिसांसोबत दुसऱ्या एका समाजाचे लोक होते. ते दगड मारत असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नव्हती असा आरोपही त्यांनी केला.दंगलीमध्ये मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी दगड गोळा केले. यावेळी छोट्या ट्रकभर दगड जमा करण्यात आले. त्यामुळे इतके दगड दंगलखोरांनी कुठून आणले, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

Story img Loader