नागपूर : सोमवारी रात्री झालेल्या दंगलीनंतर पोलीस विभागाने मुस्लीमबहुल परिसरात गाड्यांची तोडफोड करत अनेकांच्या घरांचे नुकसान केल्याचा आरोप मुस्लीम बांधवांनी लोकसत्ताशी बोलताना केला. भालदारपुरा परिसरातील शाहिस्ता शेख यांच्या पतीच्या फातिहा(दहाव्या दिवसाच्या) कार्यक्रमासाठी घरीच सर्व तरुण मंडळी बसून असताना पोलिसांनी घराची तोडफोड करत सात मुलांना अमानुषपणे मारहाण करत पकडून नेल्याचा आरोप शाहिस्ता यांनी केला. माझ्या मुलांची चुकी असेल तर नक्की शिक्षा करा. परंतु, घरात बसलेल्या मुलांना अमानुषणे मारणे, त्याचा डोळा फोडणे हा कुठला न्याय? असा प्रश्न करत त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

सोमवारी रात्री झालेल्या दंगलीनंतर या भागातील स्थानिक दुकानदारांची दुकाने बंद आहेत. दंगल शमली आहे. परंतु, पोलीस विभागाच्या दडपशाही धोरणाने मुस्लीम बांधवांवर अमानुष अत्याचार केल्याच्या प्रतिक्रिया हंसापुरी आणि भालदारपुरा परिसरातील मुस्लीम बांधवांच्या आहेत. शाहिस्ता शेख यांनी सांगितले की, त्यांच्या पतीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. सोमवारी त्यांच्या दहाव्या दिवसाचा कार्यक्रम असल्याने त्यांचे नातेवाईक आले होते. परंतु, पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्या मुलांना आणि आलेल्या नातेवाईकांनाही पकडून नेले. त्यांच्यावर अमानुष अत्याचार केला. घराच्या काचा फोडल्या आणि सर्व खोल्यांची दारेही तोडली. त्यांची मुलं दिवसभर घरीच होती. रात्री दंगल झाल्यावर घराच्या छतावरून सर्व प्रकार बघत होती. पोलिसांना हे तरुण दिसल्यावर त्यांनी घरासमोर असलेल्या सर्व गाड्या काठी आणि दगडाने फोडल्या आणि घरातील सात तरुणांची कुठलीही चूक नसताना त्यांना ओढत घेऊन गेले. या सर्व प्रकारात शाहिस्ता शेख यांच्या मुलाचा एक डोळाही फुटला, असे त्यांनी सांगितले.

माझ्या भावांना परत आणून द्या : नुसरा शेख

नुसरा शेख यांनी सांगितले की, आम्ही पोलिसांना पूर्णपणे मदत करायला तयार आहोत. माझ्या दोन्ही भावांची काहीही चूक नाही. आम्ही भारताचे नागरिक आहोत. आम्ही येथील व्यवस्थेला पूर्णपणे मदत करायला तयार आहोत. मात्र, पोलीसच आज आमचे शत्रू होत असतील तर आम्ही दाद कुणाला मागायची. काहीही करा, पण माझ्या भावांना परत आणून द्या. त्यांचा काहीही दोष नाही अशी आर्त हाक नुसरा यांनी दिली.

कोण औरंगजेब, आमचा काय संबंध : शाकीब

औरंगजेब काेण आहे, त्याने काय केले, त्यांची कबर पाडायची की नाही, याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. अनेक पिढ्यांपासून या परिसरात हिंदू-मुस्लीम एकत्र राहतात. परंतु, सोमवारी झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी मुस्लीम समाजाला लक्ष्य करून आमच्या गाड्या फोडल्या, असे गीतांजली चौक येथील शाकीब याने सांगितले. त्यांची टॅक्सी आणि अन्य दोन गाड्या फोडल्या. संपूर्ण घटनाक्रम त्यांच्या घरी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये बंद आहे. परंतु, पोलीस विभागातील कुठलेही अधिकारी त्याची दखल घ्यायला तयार नाहीत, असेही शाकीबने सांगितले.

Story img Loader