नागपूर : सोमवारी झालेल्या दंगलीत मुख्य सूत्रधार म्हणून फहीम खानवर लावलेले आरोप खोटे आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या एका पदाधिकाऱ्याने सहा महिन्यांआधी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला होता. याविरोधात फहीम खानने पोलीस तक्रार केली होती. त्यामुळे द्वेष भावनेतून फहीम खानला बदनाम केले जात आहे. दंगलीचे मुख्य सूत्रधार दुसरेच कुणी असल्याचा खळबळजनक आरोप मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे (एमपीडी) कार्याध्यक्ष हामीद इंजिनिअर यांनी केला. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केला.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना हामीद यांनी हा आरोप केला आहे. बांग्लादेशमध्ये आंदोलन सुरू असताना राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या एका पदाधिकाऱ्याने दंगल घालण्याचा प्रयत्न केला हाेता. याविरोधात फहीम खाने याने पोलिसात तक्रार दिली होती. त्याचा राग म्हणून फहीमवर कारवाई होत आहे. औरंगजेबाचा विरोध करा, आम्हाला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. परंतु, सुफी संत बाबा ताजुद्दीन यांची चादर आणून तिला पायदळी तुडवणे हा संपूर्ण कुराणचा अपमान आहे. याविरोधातच गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी फहीम गेला होता. यावेळी पोलिसांनी चादर जाळल्याची तक्रार घेतली नाही. पोलीस उलट बजरंग दलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही हामीद इंजिनिअर यांनी केला.

…तर फहीमला फासावर चढवा

नागपूर हे हिंदू मुस्लीम एकतेचे नागपूर शहर आहे. आम्ही दंगलीच्या विरोधात आहोत. या संपूर्ण प्रकरणात एकतर्फी कारवाई सुरू असून आमचा आता पोलिसांवर विश्वास नसल्याने न्यायालयीन चौकशी होणे आवश्यक आहे. पोलिसांनी फहीम खान दंगलीत असल्याचा एक चित्रफीत दाखवली आणि तो गुन्हेगार असल्याचे सिद्ध होत असे तर त्याला फासावर चढवा अशी मागणीही हामीद इंजिनिअर यांनी केली.

पोलिसांवर हल्ला करणारे अतिरेकी

पोलिसांवर ज्यांनी कुऱ्हाडीने हल्ला केला असेल त्यांना फाशीवर चढवा आमचा त्याला विरोध नाही. मुस्लीम लोकांनी गाड्या फोडल्या हे ठीक आहे. पण मुस्लीम भागात जी तोडफोड झाली त्यावर कोणीही कारवाई करायला तयार नाही, असा आरोपही त्यांनी केला. महिला पोलिसांसोबत विनयभंग करणारा किंवा पोलिसावर हल्ला करणारा अतिरेकी आहे. तो कुठून आला याचा शोध व्हायला हवा. आमचे पोलीस इतके कमजोर कसे पडले. अशांना फाशीवर लटकवा, अशी मागणी हामीद यांनी केली.