नागपूर : भालदारपुरा, इतवारी, गंजीपेठ, मोमीनपुरा हा भाग म्हणजे माझी कर्मभूमी… येथील सामाजिक सौहार्द हा माझ्यासाठी तसा अभिमानाचा विषय… जाती-पातीवरून भांडणाऱ्यांना मी अनेकदा याच माझ्या कर्मभूमीचे उदाहरण द्यायचो… पण, दंगलीनंतर माझे शब्दच मौन झालेत… या भागात झालेल्या दंगलीने सामाजिक सौहार्दाचे समीकरणच बदलून टाकले आहे… माझ्या ऑटोरिक्षातील दोन विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी दंगलीशी संबंध नसतानाही कारागृहात टाकले… त्यापैकी एक मुलगा यंदा दहावीची परीक्षा देत आहे… आजही या विद्यार्थ्यांना शाळेत सोडताना त्यांचे वेदनांनी विव्हळणारे चेहरे मला छळतात… अशा शब्दात बहुसंख्य समाजातील एका ऑटोचालकाने दंगलीचे दु:ख विशद केले.

भालदारपुऱ्यातील या ऑटोरिक्षाचे नाव आहे बाल्य ऊर्फ राम प्रभाकर फाडे. तो म्हणाला, माझे अनेक मित्र अल्पसंख्याक समाजातील आहेत. आई- वडील माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर दगावले. तेव्हा मी १८ वर्षांचा होतो. तेव्हापासून भालदारपुरा परिसरात याच लोकांच्या सहकार्याने राहतो. सुरुवातीला मी सायकलरिक्षाद्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक करायचो. अल्पसंख्याक समाजातील बांधवांच्या आर्थिक मदतीने ऑटो घेतला. आता वीस वर्षे झालीत याच ऑटोने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवतो. आताही निम्मे पैसे देणे शिल्लक आहे. परंतु कुणीही मला पैसे परत मागितल्याचे आठवत नाही.

हिंसाचारग्रस्त भागातील सिंदी हिंदी शाळेसह एकूण पाच शाळेतील ५० विद्यार्थ्यांना मी शाळेत पोहोचवतो. यातील ३० विद्यार्थी अल्पसंख्याक समाजातील आहेत. यातील काहींच्या नातेवाईकांना दंगलीशी संबंध नसतानाही पोलीस उचलून घेऊन गेलेत. त्याचा या मुलांच्या मनावर खोलवर परिणाम झाल्याचे राम फाडे याने सांगितले.

याच भागातील शेख सलीम म्हणाले, इतवारी, गोळीबार चौक, डागा रुग्णालय परिसरातील विद्यार्थ्यांची मी नियमित माझ्या ऑटोरिक्षात टाटा पारसी, आदर्श विद्यालयात ने-आण करतो. माझ्याकडे ८० टक्के विद्यार्थी बहुसंख्य समाजाचे तर २० टक्के अल्पसंख्याक समाजातील आहेत. दंगलीच्या दिवशी भालदारपुऱ्यात तोडफोड सुरू झाल्यावर आमच्या घराच्या शेजारील वाहने तोडायलाही जमाव आला. परंतु आम्ही पुढे येऊन याच भागात राहणारे पेशने यांची काही वाहने वाचवली. पेशने यांनी आमच्याबद्दल पोलिसांना खरी माहिती दिल्यामुळेच आम्ही आरोपी होण्यापासून बचावलो. विद्यार्थ्यांची वाहतूक करताना कुणीही धर्माचा विचार करत नाही. उलट दंगलीनंतर येथे परस्परांमध्ये आणखी प्रेम वाढले आहे, याकडेही शेख सलीम यांनी आवर्जून लक्ष वेधले.

जात-धर्म न बघता तोडफोड

सैय्यद रिझवान म्हणाले, मी ओला-उबेर कंपनीत ऑटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. भालदारपुऱ्यात राहतो. हिंसाचाराच्या दिवशी जमावाने तोडफोड करताना जात-धर्म बघितला नाही. माझाही ऑटो तोडला. आजही तो दुरुस्त करायची हिंमत होत नाही. रमझान महिन्यात शिल्लक पैशातून कसेतरी घर चालवले. हिंसाचारादरम्यान बाहेरून आलेल्यांना स्थानिक लोक पळवून लावत होते. तेव्हा ते उपद्रवी लोक स्थानिक अल्पसंख्याकांनाही शिवीगाळ करत असल्याचे मला काही बांधवांनी सांगितल्याचे सैय्यद रिझवान म्हणाले.

अल्पसंख्यकांना घरातच रोखले

हिंसाचारादरम्यान बाहेरचे काही लोक भालदारपुरा परिसरात आले. तेव्हा त्यांना पिटाळून लावण्यासाठी स्थानिक अल्पसंख्याकही संतापाच्या भरात बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. परंतु माझ्यासह परिसरातील बांधवांनी सुरक्षेसाठी त्यांना बाहेर न पडण्याची गळ घातली. त्यांनीही आमच्या शब्दाला मान दिला. त्यामुळे या भागात काही वाईट घडले नाही, असे राम फाडे यांनी सांगितले.