नागपूर : सोमवारच्या दंगलीनंतर मध्य नागपुरातील चिटणवीसपुरा चौक, महाल आणि आसपासपच्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. संचारबंदी बुधवारी देखील कायम असून भालदारपुऱ्यातील युवकांना संशयित म्हणून ताब्यात घेण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे नागपुरातील महाल, गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगजेबचा प्रतिकात्मक पुतळा आणि चादर जाळण्यात आली. त्यानंतर मध्य नागपुरात दोन गटात तणाव निर्माण झाला आणि त्याचे रुपांतर दंगलीत झाले.
पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपुरातील ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी सोमवारी रात्रीपासून जाहीर केली. बुधवारी देखील संचारबंदी कायम असून दंगलीतील संशयितांना पडकण्याची शोध मोहीम राबण्यात येत आहेत. भालदारपुरा येथील एकाच कुटुंबातील पाच युवकांना ताब्यात घेण्यात आले. यातील काही युवक अल्पवयीन होते. यासंदर्भात बोलताना माजी नगरसेवक फिरोज खान म्हणाले, दंगल करणारे लोक पळून गेले. पण, आता निष्पाप युवकांना पोलीस ताब्यात घेत आहे. त्यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस सांगत असलेतरी पोलिसांची आजवरची कार्यपद्धती बघता त्या युवकांना गुन्हे दाखल केले हे निश्चित. याबाबत पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी युवकांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे लोकसत्ताला सांगितले.
दरम्यान, आज महाल, चिटणीसपुरा चौक, भालदारपुरा, बडकस चौक, इतवारी सराफा बाजार, इतवारीतील किरणाओळी, गांधीबाग, गोळीबार चौक, मोमीनपुरा, टिमकी, हंसापुरी, जुना भंडारा रोड, तीन नळ चौक, गितांजली चौक, इतवारी दहीबाजार, शांतीनगर, सतरंजीपुरा, शांतीनगर, कसाबपुरा, डोबीनगर, इतवारी बाजार या मध्य नागपुरातील जुन्या बाजारपेठा आणि लोकवस्तीमध्ये संचारबंदी कायम आहे. या भागातील औषधाची दुकाने आणि रुग्णालय वगळता सर्व दुकाने बंद आहेत. या भागात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवेश नाही.
जमावबंदी आदेश लागू असल्याने महाल, गांधी गेट, शिवाजी पुतळा, जुना फवारा चौक, चिटणीसपुरा चौक या भागात कटेकोट पोलीस बंदोबस्त आहे. या भागात कोणालाही प्रवेश नाही. परंतु स्थानिक नागरिकांना पायदळ फिरण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. केवळ एकत्रित येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सेंट्रल ॲव्हेन्यूवरील वाहतूक सुरू आहे. मेट्रो देखील सुरू आहे. शहरात भालदरापुरा, हंसापुरी, मोमीनपुरा, बडकस चौक, चिटणीसपुरा चौक, गांधी गेट, महाल येथे तणावपूर्ण शांतता आहे. महाल, इतवारी, गांधीबाग, लकडगंज, कोतवाली या परिसरातील बाजारपेठा कडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकॅडिंग केली आहे. गांधी गेट, महाल चिटणीस पार्क चौक यासह अन्य भागात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे जवानाना तैनात केले आहे. शहरातील मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील या काही निवडक लोकवस्त्या वगळता नागपूर शहरात इतरत्र सामान्य जीवन आहे.