नागपूर : नागपुरातील दंगल प्रकरणात पोलिसांनी दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खान याच्यासह ५० दंगलखोरांवर गुन्हा दाखल केले. याप्रकरणी फहीम खानला १८ मार्च रोजी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर पोलीस कोठडी देण्यात आली. आरोपी फहीम खानने शुक्रवारी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. राजकीय दबावाखाली त्याला अटकविण्याचा प्रयत्न केला जात असून त्याला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी फहीम खानने केली आहे. याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
जमावाला भ़डकण्याचा आरोप
नागपुरातील दंगल भडकविणारा मास्टरमाईंडला फहीम खानने सर्वप्रथम मोठा जमाव गोळा करुन गणेशपेठ ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. दंगल प्रकरणात पोलिसांनी ५१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींमध्ये मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टीचा अध्यक्ष फहीम खान शमीम खान याचा समावेश आहे.
आरोपानुसार, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाल गांधीगेट परिसरात औरंगजेबाचे छायाचित्र आणि त्याच्या प्रतिकात्मक कबरीचे दहन केले होते. मात्र, त्यावर हिरव्या रंगाची चादर होती. ती चादरीवर ‘आयत’ लिहिलेली होती, असा आरोप होता. त्यामुळे मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टीचा अध्यक्ष फहीम खान शमीम खान याने काही युवकांना चादर जाळल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे सांगितले. त्यांची माती भडकवली त्यांना दंगल उसळवण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर फहीम खान याने स्वत: पुढाकार घेऊन तो गणेशपेठ पोलीस ठाण्यात पोहचला.
त्याच्या पाठीमागे जवळपास ४० ते ५० युवकांचा जमाव होता. फहीमने गणेशपेठच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आणि चादर जाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी या प्रकरणात त्याला आश्वासन देऊन परत पाठवले होते. मात्र, यानंतर गांधीगेट परिसरातून फहीम खान यांच्या नेतृत्वातील युवक जात असताना त्यांनी नारेबाजी केली. त्यामुळे वाद चिघडला. या घटनेच्या दोन तासांनंतर अचानक दगडफेक सुरु झाली. पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावणाऱ्या तरुणांचा मोठा जमाव रस्त्यावर आला. त्यामुळे दंगल भडकली असल्याचा आरोप फहीम खानवर आहे.
राजकीय बदला घेण्यासाठी आरोप
फहीम खानने स्वत: या प्रकरणात चुकीच्या प्रकारे गुंतविले जात असल्याचा दावा याचिकेत केला. राजकीय बदला घेण्यासाठी त्याला गुंतविण्यात येत आहे. केवळ एफआयआरमध्ये नाव असल्यामुळे हिंसेत सक्रीय सहभाग असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. राजकीय द्वेषापोटी ही कारवाई करण्यात आली आहे, असा दावा करत जामीन मंजूर करण्याची विनंती फहीम खानने केली.