नागपूर : ‘किस मुँह से कहूँ, ये मेरा वही शहर है जो कभी अमन का पैगाम दिया करता था, अब तो जख्म इतने हुए है की, ठीक होने मे सदिया गुजर जाएगी’ ही वेदना आहे भालदारपुरा परिसरातील अबू बकर खान यांची… दंगलीने त्यांना आंतर्बाह्य हादरवून सोडले आहे… ‘ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम’चे ते सरचिटणीस… जन्मापासून अर्थात गेल्या सहा दशकांपासून नागपुरात राहतात… या सहा दशकांत त्यांनी नागपूरचा सामाजिक सौर्हादच पाहिलेला… दंगलीच्या रात्री मात्र अबू बकर खान यांच्या डोळ्यात वसलेल्या सौर्हादाच्या सुंदर चित्राला विध्वंसाचे तडे गेले… तेव्हापासून ते सारखे विचारताहेत…
‘किस मुँह से कहूँ, ये मेरा वही शहर है…? ’दंगलीमुळे काय बदलले हे सांगताना अबू बकर खान म्हणतात, कुणीतरी बाहेरची माणसे आली आणि कलंक लावून गेली. या शहराची ओळखच वेगळी. येथे असे काही घडेल, असे स्वप्नातही वाटले नाही. आता रमजान सुरू आहे. शांतीचा संदेश देणारा हा महिना आहे आणि याच शांतीच्या महिन्यात शहरात दंगल घडली. या दंगलीमुळे मनावर इतक्या जखमा झाल्या आहेत, की भरायला अनेक शतके लागतील.
देशाच्या अनेक भागात मी फिरलो. प्रत्येक ठिकाणी नागपूरबाबत जे काही बोलले जात होते, त्यामुळे ऊर अभिमानाने भरून येत होता. ‘आप उसी नागपूर शहर से हो ना, जहाँ कभी दंगाफसाद नही होता. जो शहर हमेशा शांती और अमन के लिए जाना जाता है’, असे लोक विचारायचे. आता त्यांना कुठल्या तोंडाने सांगू, की या शहराला देखील दंगलीने आपल्या कवेत घेतले.
‘त्यांच्या’ एका फोनने बळ मिळाले
दंगल झाली त्याच दिवशी माझ्या बहुसंख्य समाजातील मित्रांनी फोन केला. इकडची परिस्थिती विचारली. त्यांच्या बोलण्यातून आमच्याविषयी असलेली त्यांची चिंता जाणवत होती. आमच्या सुरक्षेची काळजी असल्याने ते आम्हाला म्हणाले, तुम्ही सर्व इकडे या. मात्र, मी त्यांना इकडे सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात इथली दहशत, भीती आम्ही अनुभवत होतो. त्यांनी आपुलकीने केलेली विचारपूस, त्यांना आमची असलेली काळजी त्या काळरात्रीला भिडण्याची ताकद देऊन गेली, हे सांगताना अबू बकर खान यांचे डोळे कृतज्ञतेने डबडबले होते.
औरंगजेबाच्या कबरीवर आंदोलन का नाही?
या शहरात कधी हिंदू-मुस्लीम वाद झाला नाही. उलट या दोन्ही समाजातील लोक कायम एकमेकांसोबत राहिले. एकमेकांच्या सणसमारंभात सहभागी होत गेले. एकाच थाळीत जेवले. मात्र, बाहेरच्या माणसांनी येऊन आग लावली. त्याची झळ सर्वांना पोहोचली. औरंगजेबाची कबर तोडायची होती ना? मग ती ज्याठिकाणी आहे तिथे आंदोलन का नाही केले? आमच्याच शहरात ही दंगल का घडवून आणली? या दंगलीची ठिणगी ज्यांनी टाकली, त्यांच्या मुलांना झळ पोहोचली नाही, याकडेही अबू बकर खान यांनी आवर्जून लक्ष वेधले.