Nagpur Breaking News Update Today : नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री (१८ मार्च २०२५) दोन गटात संघर्ष पेटल्याने तणाव निर्माण झाला होता. जमावाने एका उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला केला असून इतरांवर दगड व इतर वस्तू फेकल्याने अनेक पोलीस व नागरिक जखमी झाले. त्यापैकी दोन उपयुक्तांसाह एकूण २२ जण इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

जखमींमध्ये पोलीस उपायुक्त झोन ५ निकेतन कदम, पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) शशिकांत सातव यांच्यासह एकूण १५ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर २ अग्निशमन दलाचे जवान आणि ५ नागरिकांनाही जखमी अवस्थेत तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले गेले. दरम्यान निकेतन कदम यांना कुऱ्हाडीचे दोन घाव लागले असून जखम खोल असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तर शशिकांत सातव यांच्या पायावर रॉडने हल्ला केल्याची डॉक्टरांची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान घटनेनंतर मेयो रुग्णालयात रुग्ण वाढत असल्याचे बघत रुग्णालय प्रशासनाने तातडीने अस्थीरोग विभाग, शस्त्रक्रिया विभागासह इतरही विभागाच्या वरिष्ठ डॉक्टरांना रुग्णालयात पाचारण केले. मंगळवारी पहाटे ३ ते ४ वाजतापर्यंत या रुग्णांवर उपचार सुरू होते. किरकोळ जखमी असलेल्या अनेक रुग्णांनी रात्री उशिरा सुट्टी घेतली. तर पोलीस उपयुक्तांना रात्रीच लकडगंज परिसरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान मेयो रुग्णालय परिसरातही पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

प्रकरण काय?

नागपुरातील महाल परिसरात एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. हा सर्व प्रकार सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला. याचा परिणाम शहरातील सामान्य जनजीवनावर झालेला आहे. शहराच्या काही भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. पोलिसांनी महाल-गांधी गेटकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर ‘बॅरिकेडींग’ करून मार्ग बंद करण्यात आले.

डॉक्टरांसह परिचारिका व कर्मचाऱ्यांची तत्परता..

मेयो रुग्णालयात महाल परिसरातील घटनेचे रुग्ण वाढत असल्याचे बघत प्रशासनाने तातडीने अतिरिक्त डॉक्टरांना पाचारण केले. येथे आवश्यक औषध व सर्जिकल साहित्य उपलब्ध करण्यात आले होते. डॉक्टरांनीही झटपट रुग्ण येताच त्यावर उपचार करून त्यांना दाखल करण्याचे काम सुरू केले. दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजतापर्यंत हा उपक्रम सुरू होता. शेवटी रुग्ण स्थिर झाल्यावर डॉक्टर घरी परतले.