नागपूर : नागपूर हिंसा प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली आणि पोलिस कोठडी मिळविण्यासाठी न्यायालयात हजर केले. न्यायालयीन कारवाई रात्री तब्बल ३ वाजेपर्यंत चालली. नागपूरच्या न्यायपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच हा अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती सुलताना मैमुना यांच्या न्यायालयात रात्री तब्बल ३ वाजेपर्यंत सुनावणी सुरू होती.

संपूर्ण शहर झोपी गेले असताना, न्यायालयात वाद प्रतिवाद सुरूच होते. महल परिसरात झालेल्या दंगलीमुळे संपूर्ण भागात तणावपूर्ण स्थिती आहे. मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी या भागात मोठा बंदोबस्त तैनात केला असून, अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गणेशपेठ पोलिसांनी मंगळवारी महल दंगल प्रकरणातील ५१ पैकी २७ आरोपींना न्यायिक मजिस्ट्रेट प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले. या सुनावणीसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

निर्दोषांना अटक ?

सरकारी पक्षातर्फे आरोपींची चौकशी सुरू असताना, बचाव पक्षाने आरोप केला की, अनेक आरोपींचा या दंगलीशी काहीही संबंध नव्हता. भालदारपुरा परिसरातील स्थानिक नव्हे, तर बाहेरच्या व्यक्तींनी हिंसाचार घडवला. बचाव पक्षातर्फे वकील रफीक अकबानी व ईतर वकिलांनी सांगितले की, पोलिसांनी काही आरोपींना अत्यंत कठोरपणे मारहाण केली, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. सरकारी वकील मेघा बुरंगे यांनी हे आरोप फेटाळून लावत आरोपींना पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे ठामपणे मांडले. अखेर कोर्टाने चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली, तर उर्वरित काही आरोपींना उपचाराकारिता शासकीय रुग्नालयात व काही आरोपीना दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

सशस्त्र पोलीस २४ तास गस्तीवर

दरम्यान, नागपूरमध्ये महाल परिसरात सोमवारी उसळलेल्या दंगलीनंतर महाल, मोमीनपुऱ्याशिवाय शहरातील अतिसंवेदनशील अकरा व संवेदनशील एकोणीस ठिकाणी पोलिसांचे पथके तैनात करण्यात आले आहेत. या परिसरात सशस्त्र पोलीस २४ तास गस्त घालत आहेत.अजूनही या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. रस्त्यावर शुकशुकाट असून पोलीस अजूनही दंगलखोरांची धरपकड करीत आहेत. सोमवारी रात्री हिंसाचार उसळल्यानंतर सुमारे पाचशे जणांचा जमाव घोषणा देत दगडफेक करीत होता.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस उपायुक्त निकेतन कदम, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव आणि पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्यासह काही पोलिस कर्मचारी व दंगल नियंत्रण पथकातील महिला पोलीस तिथे गेले. जमावाने पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. त्यांना शिवीगाळ केली. पोलिसांवर हल्ला चढविला. त्यांना मारहाणही केली. एका जमावाने महिला पोलिसाला पकडले. तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करीत गैरवर्तन केले. त्यानंतर जमावाने पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली.